मुंबई, दि. १७ जून २०२०: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली या बैठकीमध्ये त्यांनी विविध राज्यांतील कोविड -१९ ची स्थिती जाणून घेतली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रभावी सादरीकरण केले. आपण लॉकडाऊनविषयी खूप बोललो..आता अनलॉकिंगविषयी बोलू या..“मिशन बिगीन अगेन” मध्ये महाराष्ट्राने झेप
घेतली आहे. असे यावेळी ते म्हणाले.
आरोग्य सुविधा, गुंतवणूक, शिक्षण याविषयी माहिती त्यांनी यावेळी दिली. ‘गेल्या दोन अडीच महिन्यात महाराष्ट्राने मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधा निर्माण केल्या आहेत. एकीकडे हा लढा सुरू असताना आम्ही मोठ्या गुंतवणूकदारांशी करार करून अर्थचक्र वेगाने फिरवायला सुरुवात केली आहे. आम्ही नुकतेच १६ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार १२ मोठ्या कंपन्यांसमवेत केले. यामुळे १४ हजार लोकांना रोजगारही मिळणार आहे. या उद्योगांत चीन, अमेरिका, दक्षिण कोरिया, सिंगापूर, अशा देशांचा समावेश आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पुढील महत्त्वाचे मुद्दे मांडले
◆ औषधांच्या उपचार पद्धतीस त्वरित मान्यता मिळावी
◆ शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकांकडून तातडीने कर्जपुरवठा करण्यासाठी निर्देश द्यावेत
◆ परीक्षांसाठी देशभर एकच सूत्र हवे.
◆ ग्रामीण भागासाठी व्हेंटीलेटर्सची गरज भासणार
◆ कोरोनाशी मुकाबला करतांना विविध औषधांचा समावेश असलेल्या उपचार पद्धती सकारात्मक परिणाम दाखवत आहेत, या औषधांना लवकर मान्यता मिळावी.
◆ केंद्राने व्यावसायिक /अव्यावसायिक परीक्षांबाबत एकसमान निर्णय घ्यावा
◆ राज्यात उद्योगांना प्रोत्साहन द्यायला सुरुवात
महाराष्ट्राने गेल्या काही दिवसांत राज्यभर सुमारे ३ लाख बेड्सची सुविधा निर्माण केली आहे. तसेच, फिल्ड हॉस्पिटल्स उभारले आहेत, अशी माहिती पंतप्रधानांना देतानाच, बीकेसी मैदानावरील दुसऱ्या टप्प्यातील रुग्णालयाची व नेस्को येथील कोविड रुग्णालयाची छायाचित्रेही दाखवली. राज्य सरकारनं ‘चेस दी व्हायरस’ला संपूर्ण प्राधान्य दिले असून चाचण्या करणे आणि संपर्क साखळीचा शोध घेणे सुरू केले आहे. यामुळे धारावीसारख्या भागातही संसर्ग थांबवल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी