नवी दिल्ली, दि. १८ जून २०२०: एलएसीवरून चीनबरोबर वाढत चाललेल्या तणावादरम्यान, सीमेसह रस्ते तयार करण्याचे काम वेगवान करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बुधवारी गृहमंत्रालयात एक मोठी बैठक झाली. या बैठकीत सीमा रस्ते संघटना (बीआरओ), आयटीबीपी, लष्कर, सीपीडब्ल्यूडी आणि गृह मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते.
इंडो-चायना बॉर्डर रोड (आयसीबीआर) – फेज २ अंतर्गत भारत-चीन सीमेवर ३२ रस्ते तयार करण्यात येणार आहेत. गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या रस्त्यांच्या निर्मितीस अधिक गती देण्यात येणार आहे. रस्ते बांधण्यासाठी लेह-लडाख येथे १५०० मजूर पाठविले जात आहेत. आज भारत-चीन सीमेच्या सुरक्षेसंदर्भात गृह मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.
यावेळी भारत आणि चीनमधील तणाव चरम स्तरावर आहे. १५ जून रोजी एलएसीवरून दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक झुंज झाली. यात भारताचे २० सैनिक शहीद झाले. तर वृत्तसंस्थेच्या एएनआयच्या म्हणण्यानुसार यामध्येही ४३ चीनी सैनिक जखमी झाले. यात अनेकांचा मृत्यू झाला तर बरेच जण गंभीर जखमी झाले.
सीमेवर रस्ता तयार होत असल्याबद्दल चीनला आक्षेप आहे. अनेक वेळा चिनी सैनिकांनी बांधकामाचे काम थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्यावरून संघर्ष झाला. पण चीनच्या विरोधाला मागे टाकून भारताने रस्ते बांधकाम वेगवान करण्याचा निर्णय घेतला.
एलएसीजवळ भारत रस्ता तयार करीत आहे त्या भागात चिनी हेलिकॉप्टर अनेक वेळा उड्डाण करतांना दिसले. भारताच्या रस्ता बांधकामांबाबत वाद निर्माण करण्यासाठी चीन सीमावर्ती भागात हेलिकॉप्टर पाठवत आहे. तथापि, चीनच्या या कारवाईवरही भारताने तीव्र आक्षेप नोंदविला आहे. कोरोना संकट हिवाळ्यानंतर सुरू झाले आणि यामुळे लडाखमधील रस्ता बांधकाम थांबविण्यात आले होते, परंतु आता ते वेगाने वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी