दौंड, दि. १९ जून २०२०: कुरकुंभ व प्रदूषण या विषयाचे समीकरण संपता संपेना. नवनवीन प्रदूषण निर्माण करणारे अवैध कारखाने या परिसरात आपले बस्तान बसवत असल्याने परिसरातील नागरीवस्तीत प्रदूषणाच्या वाढत्या पातळीने ग्रामस्थ हैराण झाले आहेत.
कुरकुंभ दौंड रस्त्यावर गट क्रमांक १४ मध्ये पी एस के इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या माध्यमातुन नव्यानेच डांबराचा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. यामध्ये पुणे सोलापूर महामार्गावरील खड्डे बुजवणे व इतर कामासाठी खडी व डांबराचे अस्तरीकरण टाकण्यासाठी उत्पादन केले जात आहे. मात्र यामध्ये असलेला साठा व या प्रकल्पासाठी लागणारी ग्रामपंचायत ना हरकत परवाने नसल्याचे समोर आल्याने यावर महसूल विभागाने कारवाई करीत हा प्रकल्प बंद केला आहे.
याबाबत कुरकुंभ ग्रामपंचायतने देखील दौंड तहसीलदार यांना लेखी तक्रार केली होती. तसेच प्रकल्प मालकास परवानगी असणारे दस्तऐवज सादर करण्याबाबत सांगितले होते. मात्र सध्या धन दांडग्या उद्योगांच्या मालकांनी आपला मनमानी कारभार करण्याचा सपाटा लावला आहे. कुरकुंभ मधील रासायनीक प्रकल्पात देखील अश्याच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली असुन आता औद्योगीक क्षेत्र सोडुन खाजगी जागेत सुद्धा अश्या प्रकारे प्रकल्प आपले पाय पसरू लागल्याने याचा प्रत्यक्ष प्रभाव नागरी वस्तीत दिसुन येत आहे. मात्र यावर प्रसासानाच्या वतीने खुली छुट देण्यात आली आहे का असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
मागील वर्षी पुणे सोलापूर महामार्गावर पांढरेवाडी हद्दीतील खाजगी जागेत एका बनावट डांबर निर्माण करणाऱ्या कंपनीवर छापा टाकुन त्यावर कारवाई करण्यात पोलीसांना यश आले होते. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या मोकळ्या जागेचा आर्थिकदृष्ट्या वापर करण्याच्या उद्देशाने स्थानीक खाजगी जागा मालक आपल्या जागा भाडे तत्वावर देत आहेत. याचा दुष्परिणाम परिसरातील लोकवस्तीवर होत असताना फक्त होणाऱ्या आर्थीक स्वार्थापोटी अश्या प्रकारचे निर्णय घातक ठरत आहेत. याबाबत संबधीत अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे या कंपनीबाबत पुढील निर्णय काय घेणार हे पाहणे गरजेचे आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: रिजवान शेख