बारामती, दि. २७ जून २०२०: बारामती शहरातील बाल रोग तज्ञ डॉक्टर भास्कर जेधे यांनी बजाज फायनान्स कंपनी कडून बिजनेस लोन घेतले होते. मार्च महिन्यापासून कोरोना साथीच्या संसर्गाने रिझर्व बँकेने दिलेल्या निर्देशाप्रमाणे डॉ जेधे यांनी त्यांच्या कर्जाचे हप्ते मॅरेटेरियम करून घेतले होते (कर्ज वसुली स्थगिती ) तरी देखील बजाज फायनान्सचे रिकव्हरीचे लोक डॉक्टर जेधे यांना त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन दबाव टाकत पैसे भरण्यासाठी मानसिक त्रास देत असल्याची तक्रार आज बारामती शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
कोरोना संसर्गाच्या महामारीने मार्च महिन्यापासून सर्व व्यवसाय व्यवहार बंद असल्याने नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. यावर उपाय म्हणून रिझर्व बँक ऑफ इंडियाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे सर्व फायनान्स कंपन्यांना पुढील तीन महिन्याच्या कालावधीत कर्जाचे हप्ते वसुली न करण्याबाबत सूचना दिल्या होत्या .
त्यानंतर ऑगस्ट २०२० पर्यंतच्या कालावधी करिता ग्राहकांना हप्ते भरण्यात शक्य नसल्यास कर्जदारांनी बँक फायनान्स कंपनीत मॅरेटेरियम करून घ्यावे अशा सूचना दिल्या होता या प्रमाणे डॉक्टर जेधे यांनी कर्जाच्या आपल्याला स्थगिती मिळावी यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण केली. कंपनीकडून देखील त्यांना याबाबत ई-मेलवरून दखल घेण्यात आल्याचा ईमेल मिळाला होता.
मात्र तरी देखील दि २५ गुरूवार सायंकाळच्या वेळेस बजाज फायनान्स कंपनीचे रिकव्हरी मॅनेजर सिद्धार्थ चव्हाण अजित कुंभार व एक अनोळखी इसम यांनी डॉक्टर जिथे काम करतात त्या बारामती हॉस्पिटलमध्ये येऊन ते भरण्याकरीता त्यांना दबाव टाकून मानसिक त्रास दिला. तसेच दि २४ व २५ रोजी दोन अनोळखी इसमांनी फोन करून हप्ते भरण्यासाठी दबाव टाकून मानसिक त्रास दिल्याने या इसमाने विरुद्ध डॉक्टर जेधे यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
या आरोपींच्या विरोधात भादवि कलम ३२२/२०२० -३८५, ४५२,५०६,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर बारामती शहर पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन शिंदे तपास करीत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव