नवी दिल्ली, दि. २८ जून २०२० : भारत आणि चीन यांच्या दरम्यान सुरु असलेला सीमा विवाद आणि देशात दाखल होत असलेला मान्सून या दोन्ही घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला मासिक रेडिओ कार्यक्रम मन की बात च्या माध्यमातून आज देशाला संबोधित केले.
आपल्या सैन्याने चोख प्रतिउत्तर दिले
सध्या देशामध्ये सर्वात चर्चित घटना म्हणजे लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यामध्ये सुरू असलेला वाद आहे. यावर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, लडाखमध्ये आपल्या भारतीय जवानांनी चिनी सैनिकांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. आपल्या देशाकडे डोळे वटारुन पाहणाऱ्यांना भारताने धडा शिकवला आहे. भारतमातेकडे डोळे वर करुन पाहाल तर तुमचे डोळे काढून घेण्याची ताकद आमच्यात आहे हे भारतीय जवानांनी दाखवून दिलं आहे. जे जवान शहीद झाले आहेत त्याबद्दल संपूर्ण देशाला अतीव दुःख आहे. मात्र ज्या कुटुंबातले जवान शहीद झाले त्यांनीही घरातल्या दुसऱ्या मुलांना सैन्यातच भरती करणार असे म्हंटले आहे. सैन्याने देशासाठी जे बलिदान दिले आहे त्याचा देशाला नेहमीच अभिमान असणार आहे, असे मोदी यावेळी आपल्या मन की बात मध्ये म्हणाले.
लॉकडाऊनपेक्षा अनलॉक दरम्यान अधिक सतर्क राहा
पंतप्रधान म्हणाले की, “लॉकडाऊनपेक्षा अनलॉक दरम्यान अधिक सतर्क असले पाहिजे. ही गोष्ट नेहमी ध्यानात असू द्या जर तुम्ही बाहेर जात असाल तर सर्व दक्षता बाळगली पाहिजे. जर तुम्ही मुख पट्टी लावत नसाल, स्वतःला निर्जंतुक करत नसाल, बाहेर वावरताना योग्य असे शारीरिक अंतर ठेवत नसाल तर तुम्ही केवळ स्वतःलाच नव्हे तर पूर्ण देशाला देखील धोक्यामध्ये टाकत आहात. करोनाचे संकट वाढत आहे, त्यावर आपण अनेकदा बोललो आहोत. अनेकांना वाटतंय की हे वर्ष कधी संपेल. कुणी म्हणत आहे की हे वर्ष शुभ नाही. लोकांना वाटत आहे की हे वर्ष लवकर संपावे . अशा चर्चा का होत आहेत याचा विचार करतो तेव्हा मला हेच वाटतं की कोरोनाचं संकट हेच यामागचं कारण आहे. कोरोनाचे संकट येणार हे आपल्याला सहा-सात महिन्यांपूर्वी कुठे ठाऊक होते?”
लोक सहभागाशिवाय कोणतीही मोहीम शक्य नाही
पंतप्रधान म्हणाले की, “लोकसहभागाशिवाय कोणतीही मोहिम पूर्ण करता येणार नाही. म्हणूनच नागरिक म्हणून स्वावलंबी भारताच्या दिशेने आपल्या सर्वांचे दृढनिश्चय, समर्पण आणि सहकार्य खूप महत्वाचे आहे. आपण स्थानिक गोष्टी खरेदी करण्यावर भर देत असाल तसेच स्थानिक उत्पादने इतरांनी खरेदी करावी म्हणून सांगत असाल तर ही देखील एका प्रकारे देशाची सेवाच असेल. भारताचा संकल्प म्हणजे – भारताच्या स्वाभिमान आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करणे. भारताचे लक्ष्य हे स्वावलंबी भारत बनणे हे आहे. विश्वास आणि मैत्री ही भारताची परंपरा आहे, बंधुता हा भारताचा भाव आहे. या सर्व अदर्शांसहच आपण आपला देश पुढे नेत राहणार आहोत. अनेक संकटांचा सामना करत आपल्याला पुढे जायचे आहे. या वर्षातच आपल्याला नवी स्वप्ने पाहायची आहेत हे कुणीही विसरु नये. मला १३० कोटी भारतीयांवर पूर्ण विश्वास आहे. संकट कितीही मोठे असले तरीही भारताचे संस्कार हे निस्वार्थ भावनेने सेवेची प्रेरणा देतात हे अत्यंत महत्त्वाचं आहे”
“अम्फान, निसर्ग यासारखी चक्रीवादळं येऊन गेली. शेजारी देश कुरापती काढतो आहे. तरीही आपण सगळ्या संकटांना तोंड देतो आहे. हे वर्ष अशुभ नाही हे लक्षात घ्या. एका वर्षात एक आव्हान येवोत किंवा ५० आव्हाने येवोत डगमगून जायचं नाही हे भारताचं वैशिष्ट्य आहे.” असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी