नेपाळ, दि. २८ जून २०२०: नेपाळचे पंतप्रधान के पी ओली यांनी रविवारी एका कार्यक्रमादरम्यान भारतावर असा आरोप केला आहे की, भारत के पी ओली यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. के पी ओली म्हणाले की दिल्लीमध्ये सुरू असलेल्या बैठका आणि काठमांडू मधील भारतीय दूतावास यांच्या सुरू असलेल्या हालचाली हे निदर्शित करत आहे की भारताकडून नेपाळ विरोधात काहीतरी योजना आखल्या जात आहेत.
ओली यांनी आणखी एक गंभीर आरोप केला. ते म्हणाले की, “त्यांच्या सरकारच्या मागच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जेव्हा चीन सोबत ट्रेड अँड ट्रांजिस्ट करारावर हस्ताक्षर केले होते तेव्हा भारताने त्यांचे सरकार पाडले होते. परंतू आता तसे होणार नाही कारण आमच्याकडे आता बहुमत आहे.” के पी ओली असे म्हणण्याचे कारण असे आहे की, त्यावेळेस के पी ओली यांच्यासोबत प्रचंड यांची युती होती. प्रचंड यांनी आपली युती तोडली त्यामुळे के पी ओली यांचे त्यावेळचे सरकार पडले होते.
ओली आपल्या भाषणात म्हणाले की, नेपाळमधील अनेक नेते मला असे सांगत आहेत की जेंव्हा नवीन नकाशा मी प्रसारित केला आहे ज्यात काही भूभाग नेपाळचा असल्याचा सांगितले आहे ती मोठी चूक आहे. असे दाखवले जात आहे की मी खूप मोठी चूक केली आहे.
पुढे ते म्हणाले की, मी एक कायमस्वरूपी पंतप्रधान होण्याची इच्छा ठेवत नाही. परंतु जर मी पंतप्रधान पदावर नसेल किंवा जर माझे सरकार पाडले गेले तर नेपाळच्या बाजूने बोलणारी व्यक्ती राहणार नाही किंवा नेपाळच्या बाजूने इतर देशांचा विरोध करत बोलणारे कोणी नसणार. केवळ आजच्यासाठी नव्हे तर भविष्यासाठी तसेच केवळ माझ्यासाठी नव्हे तर देशासाठी हे सरकार अस्तित्वात असणे महत्त्वाचे आहे.
ओली म्हणाले की, आतापर्यंत नेपाळ फक्त भारतावर अवलंबून आहे. आपण असे म्हणतो की आपल्याला तीन बाजूने भारताने वेढलेले आहे. परंतु प्रत्यक्षात जर बघितलं तर आपण चारी बाजूंनी वेढले गेले आहोत. नेपाळ आतापर्यंत केवळ भारतावरच सर्व गोष्टींसाठी अवलंबून होता म्हणूनच आता आम्ही चीनचा नवा दरवाजा उघडला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी