मुंबईला हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट

मुंबई, २ जुलै २०२० : भारतीय हवामान खात्याने मुंबई ठाणे सह उत्तर भारतातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. येत्या तीन आणि चार तारखेला पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले. या सूचनेनुसार मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई ठाणे आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये उद्या व परवा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यासह विदर्भ, मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात मंगळवारी हलका ते जोरदार स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. पश्‍चिम किनारपट्टीला समांतर असलेला कमी दाबाचा पट्टा, गुजरात आणि परिसरावर असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थितीमुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडण्याचा अंदाज आहे. कोकणात गुरुवारी (ता.२) आणि शुक्रवारी (ता.३) कोकणासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

ऑरेंज अलर्ट म्हणजे काय?

कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते. येणाऱ्या संकटासाठी नागरिकांनी तयार रहावे म्हणून प्रशासनाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात येतो. वीजपुरवठा खंडित होणे, वाहतूक ठप्प होण्यासारखे प्रकार घडू शकतात. ही एक प्रकारे पुढच्या संकटाची तयारी असते. गरज असेल आणि महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा असेही या अलर्टमध्ये सांगितले जाते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा