आधुनिक, सामाजिक स्तरावर भारत देशात आदराने पाहण्यात येणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा मोठा पगडा असणार्या राज्यात शोकांतिका वाढवणाऱ्या घटनेकडे वाटचाल सुरू आहे. ती म्हणजे, जनगणना आयुक्तांनी नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील मुलींचा जन्मदर घटल्याची धक्कादायक आकडेवारी समोर अली आहे आणि तीच आता चिंतेची बाब आहे. कोरणा च्या बातम्या मुळे या अहवालाकडे प्रसारमाध्यमांनी थोडासा कानाडोळा केला पण ही गोष्ट नक्कीच महाराष्ट्राची चिंता वाढवणारी आहे हे नक्की.
२०१८ मध्ये जनगणना विभागाने केलेल्या सर्वेक्षणाची अधिकृत आकडेवारी विभागाने प्रसिद्ध केली आहे त्या माहितीनुसार २०१३ मध्ये जो बालमृत्यू दर हजारी 40 होता तो घटून पाच वर्षात सरासरी ३२ झाला आहे, याचाच अर्थ असा की देश पातळीवर बालमृत्यू दर हा कमी झाला आहे व त्याचबरोबर देशपातळीवरील मुलींचा जन्मदर वाढला आहे. सन २०१६ ते २०१८ च्या कालावधीमध्ये देश पातळीवर एक हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर हा ८९९ होता तर देशपातळीवर ३२ मुलांमागे एक बाळाचा मृत्यू होतो, ग्रामीण भागात हेच प्रमाण २८ मुलांमागे १ तर शहरी भागात ४३ मुलांमागे १ असा मृत्युदर आहे.
विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार छत्तीसगड राज्यांमध्ये मुलींचा जन्मदर हा सर्वाधिक असून तो जवळपास ९८५ असा आहे तर सर्वात कमी जन्मदर हा उत्तराखंडमध्ये ८४० असा आहे. विभागाने जाहीर केलेल्या सॅम्पल रिपोर्ट २०१८ मध्ये असे दिसून येते की देशातील बालमृत्यूचे प्रमाण घटले आहे ही आनंदाची बाब आहे.
पण विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील मुलींचा जन्मदर घटला आहे हे अधोरेखित केले आहे, हीच मुळात चिंतेची बाब आहे. शासनाने कितीही जनजागृती केली, कितीही लोकांच्या मनावर बिंबवले की मुलगी वंशाचा दिवा होऊ शकते हे आजही लोकांच्या पचनी पडत नाही. साधे उदाहरण घ्यायचे तर सद्यस्थितीत बारामतीमध्ये सरकारी व हॉस्पिटल मध्ये मुलगी झाली या कारणाने पित्याने आपल्या पत्नीला हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना रागाने मारहाण केली. हे एकच उदाहरण खूप काही बोलून जाते शासनाने कितीही कडक निर्बंध सोनोग्राफी सेंटरवर आणले तरी परळी मध्ये जो काही प्रकार घडला स्त्रीभ्रूणहत्येचा तो रोखू शकत नाही.
महाराष्ट्रात सोनोग्राफी सेंटरमध्ये लिंगभेद चाचणी करण्यास मोठ्या रकमेचा दंड आकारला जातो. काही सेंटरवर प्रामाणिकपणे काम ही करतात पण जे चोरून लिंगभेद चाचणी करून स्त्रीभ्रूणहत्या करतात त्याचाच परिणाम म्हणजे मुलीचा महाराष्ट्रातील जन्मदर घटला व या चोरून करणाऱ्या सोनोग्राफी सेंटर चे स्त्री जन्मदर घटण्यावरती योगदान आहे, याला कुठेतरी शासनाने आणखीन कडक निर्बंध लावण्याची गरज आहे नाहीतर हे प्रमाण असेच राहिले तर आपल्यावर ही एक वेळ अशी येईल की पांडवांनी महाभारतात जसे लग्न केले तीच वेळ महाराष्ट्रावर येऊ शकते?
कारण विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार २०१२ ते २०१४ मध्ये मुलींचा जन्मदर हा हजारी ८९६ इतका होता तोच २०१६ ते २०१८ मध्ये ८८० पर्यंत खाली आला आहे. आजही समाजाची मानसिकता ही वंशाला दिवा असण्याचीच आहे व हीच मानसिकता बदलण्याची यक्ष प्रश्न समोर उभा आहे.
अशोक कांबळे.