आज पुन्हा मुंबईत पडणार मुसळधार पाऊस

मुंबई, दि. ४ जुलै २०२०: गुरुवारी भारतीय हवामान खात्याने मुंबई, ठाणे तसेच पालघर या ठिकाणी मुसळधार पावसाची चेतावणी दिली होती. या चेतावणीसह मुंबईला ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आला होता. या चेतावणीला अनुसरून काल मुंबईमध्ये सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली होती. सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुंबईतील अनेक ठिकाणी व रस्त्यांवर पाणी साठले होते. हवामान खात्याने ३ जुलै आणि ४ जुलै असे दोन दिवस ऑरेंज अलर्ट जाहीर केले होते. त्यानुसार आज (४ जुलै) देखील मुंबई मध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

आज मुंबईमध्ये समुद्रकिनाऱ्यालगत उंच लाटा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यानुसार प्रशासनाने देखील तयारी करून ठेवली आहे. सकाळी ११ वाजून ३७ मिनिटांनी समुद्राला मोठी भरती येणार असून यावेळी ४.५ मीटर पेक्षा जास्त उंचीच्या लाटा किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने आपल्या २४ विभाग कार्यालयांसह संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

शुक्रवारी देखील सकाळपासूनच सुरू झालेल्या संततधार पावसामुळे मुंबईतील अनेक ठिकाणी पाणी साठले होते. विशेषकरून रस्त्यांवर साठलेल्या पाण्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. मुंबई मधील तब्बल ३८ ठिकाणी रस्त्यांवर पाणी साठले होते त्यामुळे वाहतूक थांबली होती. यामध्ये अंधेरी सबवे आणि किंग्ज सर्कल भागात तुलनेने जास्त पाणी होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा