पुणे, दि. ६ जुलै २०२० : भारत आणि चीन यांच्यामध्ये सध्या तणाव वाढत चालला आहे. विशेष म्हणजे गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या प्रकरणानंतर हा तणाव चरम सीमेवर गेला आहे. त्यानंतर भारत सरकारने चीनची आर्थिक कोंडी करण्यासाठी तसेच त्यांच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. यामधील एक निर्णय म्हणजे चिनी बनावटीचे ५९ ॲप्स भारताने प्ले स्टोअर वरून काढून टाकण्यास सांगितले. त्यामुळे आता भारतातील नागरिकांना यामधील काही ॲप्सला पर्यायी ॲप शोधण्याची वेळ आली आहे. फोन मधील मोठ्या फाइल्स जर दुसऱ्या फोन मध्ये ट्रान्सफर करायचे झाले तर शेअर इट किंवा झेंडर सारखे ॲप्स वापरले जात होते. परंतू हे दोन्ही ॲप्स चीनी बनावटीचे असल्यामुळे सध्या हे भारतात प्रतिबंधित करण्यात आले आहे.
त्यामुळे युजर्स सध्या अशा फाइल्स ट्रांसफर करण्यासाठी दुसऱ्या अॅपच्या शोधात आहेत. अशा युजर्सना आता गुगलकडून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. गुगल सध्या एक नवीन फीचरची टेस्टिंग घेत असून याद्वारे मोठ्या साइजच्या फाइल्स काही सेकंदांमध्ये दुसऱ्या फोनमध्ये ट्रांसफर करता येणे शक्य होणार आहे. अॅपल मध्ये एअर ड्रॉप नावाचे फीचर्स आपल्याला माहीत असेलच. हे फीचर्स देखील शेअर इट प्रमाणेच मोठ्या फाईल ट्रान्सफर करण्याचे काम करते. या एअर ड्रॉप प्रमाणेच आता गुगलने देखील “शेअर नियर” नावाचे ॲप बनवण्यास सुरुवात केली आहे. गूगलच्या या नवीन फिचरच्या माध्यमातून मोठ्या फाइल्स अवघ्या काही सेकंदांमध्ये ट्रान्सफर करणे शक्य होणार आहे.
गुगल कडून या ॲप्सच्या बीटा टेस्टिंगला सुरूवात झाली असून काही बीटा व्हर्जन वापरणाऱ्या युजर्सना हे फीचर उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. हे नवीन फीचर अँड्रॉइड ६ आणि त्यानंतरच्या पुढील सर्व अँड्रॉइड डिव्हाइसला सपोर्ट करेल. अॅपलच्या एयर ड्रॉप द्वारे युजर्स कॉन्टॅक्ट्स आणि फोटो कोणत्याही एक्स्ट्रा सेटअप शिवाय सेंड करु शकतात. त्याचप्रमाणे गुगलचे हे नवीन फीचर अँड्राइड ग्राहकांना पर्याय देईल. androidpolice च्या रिपोर्टनुसार, फोटो, व्हिडिओ आणि लिंक्सही या फीचरद्वारे शेअर करता येतील.
न्यूज अनकट प्रतिनिधी