नीरा (पुरंदर), दि. ७ जुलै २०२०: पुरंदर तालुक्यातील नीरा येथे वाईहून धुळ्याकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या मालवाहतूक करणाऱ्या बसणे अचानक पेट घेतला. रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडल्याने बस चालकांची चांगलीच धांदल उडाली. नीरा पोलीस व तरुणांनी तातडीने मदत केल्याने बस मधील काही साहित्य बस मधून बाहेर काढता आले व काही प्रमाणात नुकसान टाळता आले आहे.
काल मंगळवारी रात्री साडे अकराच्या दरम्यान निरा बस स्थानकात आलेली बस क्र. एम.एच.१४-बी.टी- ०५७६ मधून धूर येत असल्याने युवकांनी आरडाओरडा करत चालकाला याबाबतची माहिती दिली. चालकाने तातडीच्या मदतीसाठी बसस्थानकातील कंट्रोल रुमकडे धाव घेतली. मात्र त्या ठिकाणी कोणतेच कर्मचारी नसल्याने आता मदत मागायची तरी कोठे? हा त्याच्यापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला होता.
बसमध्ये त्यावेळी दोन चालक होते. वाई (जिल्हा सातारा) येथून ही बस बीड येथे सोलर वॉटर हीटर घेऊन निघाली होती. नीरा नदीच्या पुलावर या बसचा टायर पंचर झाल्याने ड्रायव्हरने बस सुरक्षेच्यादृष्टीने नीरा बस स्थानकात आणली होती. गाडी उभी करताच गाडीच्या मध्यभागात धूर येत असल्याचे युवकांनी त्यांना सांगितले. युवकांनी शेजारीच असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत अग्निशमन दलाला फोन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी नीरा येथील जुबिलंट लाईफ सायंन्सेस कंपनीची अग्निशमन गाडी काही क्षणात पोहचली.
या दरम्यान युवकांनी बसमधील सोलर साहित्य बाहेर काढण्यास सुरुवात केली होती. निम्मे सोलर साहित्य बाहेर काढले होते. मात्र मध्यभागी आग लागल्याने येथील सोलरच्या टाकल्या काढणे अशक्य होते. याचवेळी अग्निशमन दलाची गाडी आली पाण्याचा व फोमचा फवारा करत आग विझवणे सुरुवात केली. तरीही आग काही विझत नव्हती. तर ती भडकत होती. प्रचंड धूर येत होता. त्यामुळे बस मध्ये काही वेगळे तर नाही ना अशी शंका व्यक्त केली. मात्र सोलर टँक मधील थर्माकोल वितळून पेट घेत असल्याने आग वाढत होती. बसच्या काचेच्या आतून पत्रा लावल्याने काचा फोडल्या वरही पाणी आत जात नव्हते.
अग्नीशमन दलाच्या सचिन कुलकर्णी व सहकार्याने मोठे शर्तीचे प्रयत्न केल्यानंतर सुमारे दोन तासानंतर आग आटोक्यात आली. आग आटोक्यात येईपर्यंत मात्र निम्मे सोलर साहित्य जळून खाक झाले होती. एसटी बस चालक हे या गावातील लोकांचे नातेवाईक असल्याने मदत कार्यात चांगले सहकार्य झाले. दोन तास चाललेल्या या अग्नी तांडवा दरम्यान रात्र पाळीला असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना फोन केल्यावर ही दोन तासत येता आले नाही.
पब्जी प्लेयर्स मुळे मोठा अनर्थ टळला
रात्रीच्या वेळी युवक ऑनलाईन पद्धतीने पब्जी खेळ खेळत असतात. काही युवक घरात बसून तर काही युवक रस्त्यावर किंवा मोकळ्या ठिकाणी पब्जी खेळत असतात. बसस्थानक परिसरात पब्जी खेळत असलेल्या युवकांनी ऑनलाईन असलेल्या आपल्या मित्रांना खेळादरम्यान निरा येथे बस स्थानकात एक बस पेटत असल्याचे सांगितले. ही घटना निरासह परिसरातील गावांमध्ये वाऱ्यासारखी पसरली व लोक व युवक मदत कार्यासाठी धावून आली. अन्यथा फक्त अग्निशमन दलाच्या व पोलिसांच्या बळावर बस मधील साहित्य तातडीने बाहेर करणे शक्य झाले नसते. युवकांनी त्या बसमध्ये चढून पाण्याचा फवारा मारला वेगवेगळ्या युक्त्या लढवत बसची आग आटोक्यात आणण्याचा शर्तीचा प्रयत्न केला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे