तामिळनाडूतील तुतीकोरीन शहरातील घटना पाहिल्यानंतर अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. शहरात कोरोना मुळे लोक डाऊन आहे शहरातील पी जयराज यांचे शांताकुलम पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल विक्री व दुरुस्तीचे दुकान आहे तेच दुकान नियमानुसार बंद करण्यात दिरंगाई झाली व त्याच वेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्यांना हटकले, त्यांनी हुज्जत घातली या कारणाने त्यांना सरळ पोलीस ठाण्यात नेऊन एखाद्या अट्टल गुन्हेगारांना सारखे मारहाण करण्यात आली वडील यांना ठाण्यात नेले हे कळाल्यानंतर मुलगा बेत्रिकस तिथे पोचला तर त्यालाही पोलिसी खाक्या दाखवण्यात आला. पिता-पुत्रांना इतकी जबर मारहाण करण्यात आली की त्यांना धड उभेही राहता येत नव्हते की बोलताही येत नव्हते. पोलिसांनी त्या वेळी त्यांच्या घरच्यांना फोन करून लाल रंगाची कपडे घेऊन येण्यास सांगितले कारण पिता पुत्राचा रक्तस्त्राव होत होता तो झाकला जावा. या परिस्थितीत पोलिसांनी त्यांना दवाखान्यात न नेता मध्यरात्रीच्या सुमारास न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर घरी उभा करून न्यायदंडाधिकाऱ्यां कडून दोन दिवसांची कोठडी मंजूर करून घेतली.
न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर ज्यावेळी उभे करण्यात आले त्यावेळी मध्यरात्र झाली होती व न्यायदंडाधिकाऱ्यांनी दुसऱ्या मजल्याच्या सज्जातूनच आतूनच आरोपी कोण आहेत काय गुन्हा केला आहे याची साधी चौकशीही केलेले दिसत नाही. न्यायदंडाधिकाऱ्यांनी थोडे जरी बारकाईने पाहिले असते तर त्यांनी त्यांना पोलिस कोठडी न देता सरळ हॉस्पिटल मध्ये पाठवले असते, या कारणाने त्यांचा निष्काळजीपणा समोर येतो इतका गलितगात्र अवस्थेत हे कोण आहेत याची विचारपूसही करू नये इतकी आपली न्यायव्यवस्था निर्दयी झाली आहे का ? किंवा न्याय दंडाधिकार्यांना रातांधळेपणा होता हे समजण्यास मार्ग नाही. न्याय व्यवस्थाच जर असे वागणार असेल तर सर्वसामान्य नागरिक कोणाकडे दाद मागणार? कारण जे पिता पुत्र मारले गेले हे कोणी दहशतवादी नव्हते तर सर्वसामान्य नागरिक होते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील पोलिसांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून परिस्थिती आता आटोक्यात आणायचा प्रयत्न करत आहेत, ते पाहून देशातील पोलिसांच्या बाबतीत बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक होता तो बदलला गेला होता व अशा घटनेने तो पुन्हा नकारात्मक च्या दिशेने जात आहे.
पोलिसांनी इतकी अमानुष मारहाण करून ही आपले हात झटकले आहेत पोलिसांनी निवेदनात म्हटले आहे की या पिता-पुत्रांनी स्वतःच स्वतःला इजा करून घेतली आहे ,असे असेल तर ते दोघेही मनोरुग्ण असले पाहिजे असला कोणताही पुरावा पोलिसांच्या जवळ नाही इतक्या खालच्या थराला जाऊन पोलीस एखाद्याचा जीव जाण्यापर्यंत मारहाण करतात हा अधिकार पोलिसांना दिला कोणी? किंवा पोलिस यंत्रणाच निर्ढावलेली आहे काय की आपले कोणी काय वाकडे करू शकत नाही पोलिसही माणूस असतो पण ज्यावेळी वर्दी अंगावर चढविली जाते त्याचा तर हा माज नाही ना? या सुन्न करणाऱ्या या घटनेमुळे सर्वच पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो.
अमेरिकास्थित जॉर्जची पोलिसांकडून हत्या झाल्यानंतर संपूर्ण अमेरिकेत लोक रस्त्यावर उतरून उग्र निदर्शने करत आहेत, इतिहासात पहिल्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना व्हाईट हाऊसच्या बंकर मध्ये लपण्याची वेळ आली. इतका उग्र निदर्शने अमेरीकेत झाली पण भारतामध्ये या घडलेल्या गोष्टीबद्दल कोणत्याही संघटनेने मनावर घेतलेले दिसत नाही. सुपरस्टार रजनीकांत ने एका ट्विट करून झालेल्या गोष्टीबद्दल शोक व्यक्त केला. झालेल्या गोष्टीबद्दल भारतात जी शांतता दिसली तीच मोठी शोकांतिका आहे व त्याचेच दुःख मोठे आहे.
अशोक कांबळे.