लोणी काळभोर, ८ जुलै २०२० : पुणे-सोलापूर महामार्गावर अवैधरित्या वाळू वाहतूक होत असल्याची बातमी पोलिसांना मिळाली. त्यानुसार लोणी काळभोर पोलिसांनी वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई केली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे यांनी उरुळी कांचन परिसरात पाच वाहनांवर ही कारवाई केली आहे. यात एकुण २७ लाख १४ हजाराची वाळू जप्त केली आहे.
पोलिस नाईक एस. एस. चितारे यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे सोलापूर महामार्गावरील कोरेगाव मूळ व उरुळी कांचन परिसरात काही वाहनातून अवैधरित्या वाळू वाहतूक होत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस कार्यालयाला समजली होती. यानंतर लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी आपले सहकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक कांबळे यांना त्वरित कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
पोलिस हवालदार एम. जे. गायकवाड, पोलिस नाईक एस. एस. चितारे, एस. व्हि. पवार, पोलिस शिपाई भोसले यांनी कोरेगाव मूळ गावच्या शिवारात इनामदार वस्तीजवळ एक टाटा कंपनीचा ट्रक तसेच उरुळी कांचन येथे अन्य वाळूचे चार ट्रक व त्याच्या चालकांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यावर त्यांच्याकडे वाळू उत्खनन व वाहतूक संदर्भात कोणतीही परवानगी नसल्याचे आढळून आले
पकडलेल्या चालकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यातील एक चालक पसार आहे. या पाच वाहनात मिळून १९ ब्रास वाळू हस्तगत करण्यात आली. व वाहतूक करणारी एकूण पाच वाहने असा एकुण २७ लाख १४ हजारांचा माल जप्त करण्यात आला आहे.
पूर्व हवेलीतील गावामध्ये अशाप्रकारे मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा चालू आहे. परंतु महसूल विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
मुळा मुठा नदीच्या काठावर नदीपात्रातील वाळू काढून अनेक वाहने रात्रीच्या वेळी बाहेर पडतात. याकडेही संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे