मुंबई, दि. १० जुलै २०२०: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे विविध प्रकारच्या मानसिक आरोग्याच्या समस्यांवर मार्ग शोधण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेणाऱ्या भारतीयांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. त्यातील बहुतेक नागरिक हे शहरातील रहिवासी असून एकटेपणा आणि नोकरी गमावण्याची तसेच उत्पन्न कमी होण्याची चिंता यासारख्या विविध मुद्द्यांवर समुपदेशन मिळविण्यासाठी ते ऑनलाइन टेली मेडिसिन मंचाचा वापर करीत आहेत.
मानसिक आरोग्याच्या समस्येचे महत्त्व ओळखून केंद्राने कोविड १९ विषयी लोकांमध्ये वाढणाऱ्या मानसिक-सामाजिक चिंतांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी यंत्रणा तयार करून ती बळकट करण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. मानसिक आरोग्याच्या समस्यांना अग्रक्रम देण्याच्या गरजेवर तसेच मानसिक समस्यांना सामान्य आजार म्हणून मान्य केल्यास उपचारांसाठी उपयुक्त ठरेल यावर जोर देण्यात आला. केंद्र सरकारला अभिप्रेत आहे कि सल्ला आणि जागरूकता अभियानासह मानसिक आरोग्य सेवा या कोविड १९ विषयीच्या सरकारच्या प्रतिसादाचा भाग बनल्या पाहिजेत. भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिव प्रीती सुदान त्यांच्या ‘माईंडींग अवर माईंड ड्युरिंग कोविड १९’ या ब्लॉगमध्ये लिहितात कि,“शारीरिक आरोग्याच्या बाबतीतच नव्हे तर भारतामध्ये परिपूर्ण मानसिक आरोग्याबाबतही नकारात्मकता आणि प्रतिकूलता दिसून येते. अनेक भारतीयांना हे स्वीकारणे फार कठीण आहे की त्यांच्या जवळच्यांना तज्ज्ञ वैद्यकीय मदतीची आवश्यकता असू शकते.
२०१७ मध्ये प्रसिद्ध झालेल्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) राज्यस्तरीय अहवालात असे नमूद करण्यात आले होते की देशातील सातपैकी एक व्यक्ती वेगवेगळ्या तीव्रतेच्या मानसिक विकारांनी ग्रस्त आहे, औदासिन्य आणि चिंताग्रस्त विकार सर्वात सामान्य असून त्यांचा परिणाम अनुक्रमे ४५.७ दशलक्ष आणि ४४.९ दशलक्ष लोकांवर होतो. मानसिक आरोग्य आणि मज्जासंस्था विज्ञान राष्ट्रीय संस्थेने केलेल्या देशव्यापी राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षण २०१५-१६ च्या निष्कर्षातून असे दिसून आले आहे की जवळपास १५० दशलक्ष भारतीयांना सक्रिय मानसिक आरोग्य सेवा आवश्यक आहेत तर ३० दशलक्षाहूनही कमी लोक हे समर्थन शोधत आहेत. सुदान म्हणाल्या, “कोविड -१९ मुळे या मानसिक आरोग्याच्या धोक्याकडे अभावितपणे मोठ्या प्रमाणात लक्ष वेधले गेले आहे आणि म्हणूनच, सुरक्षित शारीरिक अंतराचा उपाय महामारीच्या शारीरिक पैलूचा सामना करण्यासाठी सर्वात प्रभावी मार्ग म्हणून जागतिक स्तरावर अंमलात आणला जात आहे, पण मानसिक आरोग्यासाठी परिणामकारक अशा सामाजिक जाळ्याची वीण अचानक तुटत चालली आहे.”
आरोग्य मंत्रालयाच्या तांत्रिक सल्लागार कविता नारायण यांच्या मते “कोविड -१९ च्या रूग्णांशी निगडित गैरसमज हे आपल्याला दररोज भोगायला लागणाऱ्या अज्ञात निर्णयाचे दुर्दैवी प्रतिबिंब आहे. इतरांसाठी आपला जीव धोक्यात घालून कुटूंबापासून दूर चोवीस तास काम करणार्या डॉक्टर आणि काळजीवाहूंना त्यांच्या समाजात बहिष्कृत केले जात आहे. सर्वात महत्वाच्या व्यक्तींनाही तणाव निर्माण करण्यासाठी हे पुरेसे आहे. ”बेंगळुरूस्थित मानसिक आरोग्य आणि मज्जासंस्था विज्ञान राष्ट्रीय संस्थेने महामारी आणि टाळेबंदी संबंधित मानसिक आरोग्य तसेच मानसिक-सामाजिक विषयांवर समुपदेशन करण्यासाठी (०८०-४६११०००७) ही एक राष्ट्रीय हेल्पलाईन सुरू केली आहे. कोविड -१९ आरोग्यसेवा योद्धांसाठी समर्पित असलेली ही हेल्पलाइन अनेक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. मानसिक आरोग्य समर्थनासाठी स्वतंत्र ऑनलाइन मंच https://psychcare-nimhans.in देखील तयार करण्यात आला आहे. हा मंच रुग्णालयीन मानसशास्त्र विभाग, मानसिक आरोग्य आणि मज्जासंस्था विज्ञान राष्ट्रीय संस्था आणि ई-आरोग्य संशोधन केंद्र आयआयआयटी बंगळुरू यांच्या संयुक्त प्रयत्नावर आधारित आहे. मुख्यतः तणाव, विलगीकरण, प्रियजनांपासून विभक्त होणे, तंत्रज्ञानाचा अत्यधिक वापर, राग आणि चिडचिडेपणा, भविष्याबद्दल चिंता इत्यादी विषयीच्या शंकांचे निरसन येथे केले जाते. कोरोना विषाणू महामारी दरम्यान ताणतणाव व्यवस्थापन, सामाजिक गैरसमज, आरोग्य सेवा कर्मचार्यांच्या मानसिक-सामाजिक चिंतेकडे लक्ष देणे आणि मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांशी संबंधित असे अनेक वेबिनार आणि व्हिडिओ मानसिक आरोग्य आणि मज्जासंस्था विज्ञान राष्ट्रीय संस्था आणि अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था यांच्याद्वारे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या www.mohfw.gov.in या संकेतस्थळावर नियमितपणे अपलोड केले जातात.
खासगी क्षेत्रानेही याबाबत सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. गुरूगाव येथील स्टार्ट-अप टेलिमेडिसिन ऑनलाइन मंच लिब्रेट या संस्थेने केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की त्यांच्या मंचावर मानसिक आरोग्यविषयक स्थितीबद्दलच्या रुग्णांच्या समुपदेशनात १८० टक्क्यांनी वाढ झाली आहे ज्यात मुंबई, दिल्ली, पुणे, अहमदाबाद आणि बेंगळुरू येथून मोठ्या प्रमाणावर प्रश्न विचारले गेले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी