नवी दिल्ली, दि. १६ जुलै २०२०: कुलभूषण यादव यांना पाकिस्तानने हेरगिरीच्या खोट्या आरोपाखाली अटक केली आहे व गेले कित्येक वर्ष ते पाकिस्तानच्या कैदेमध्ये आहेत. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस मध्ये कुलभूषण यादव प्रकरण अनेक वेळा नेण्यात आले आहे आणि प्रत्येक वेळेस पाकिस्तानला भारताच्या काही गोष्टी मान्य कराव्या लागल्या आहेत. यावेळेस भारताने पाकिस्तानकडे अशी मागणी केली आहे की कोणत्याही अटी शर्ती शिवाय कुलभूषण यादव यांना भेटण्याची परवानगी देण्यात यावी. भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांना कुलभूषण यादव यांची भेट घेण्यासंबंधी भारताने पाकिस्तान कडे ही मागणी केली आहे. मात्र पाकिस्तानने यामध्ये कोणतीही अट ठेवू नये तसेच संभाषण इंग्रजीमध्ये झाले पाहिजे अशी देखील अट पाकिस्तानने धरून ठेवू नये अशी मागणी करण्यात आली आहे.
इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये २० जुलै पर्यंत फेरविचार याचिका दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. त्याआधी ही परवानगी द्यावी असे भारताने म्हटले आहे. आयसीजेच्या निकालानुसार, काऊंन्सलर अॅक्सेस तसेच मुक्त आणि निष्पक्ष सुनावणी पूर्व अट असल्याची भारताने पाकिस्तानला आठवण करुन दिली आहे. भारतीय दूतावासातील दोन अधिकाऱ्यांना कुलभूषण जाधव यांना भेटू द्यावे, अशी मागणी भारताने केली आहे.
पाकिस्तान कुलभूषण यादव यांच्यावर दबाव आणून त्यांच्याकडून अनेक खोटी वक्तव्ये वदवून घेत आहे. यावेळीसुद्धा म्हणजेच मागच्या आठवड्यात पाकिस्तानने असे म्हटले होते की, कुलभूषण यादव यांनी पुनर्विचार याचिकेला नकार दिला आहे. मात्र कुलभूषण यादव यांच्याकडून पाकिस्तानने दबाव आणून हे वक्तव्य करून घेतले आहे.
“कुलभूषण जाधव प्रकरणातील एफआयआर, पुरावे, न्यायालयाच्या आदेशासह कोणतीही संबंधित कागदपत्रे भारताला देण्यास पाकिस्तानने नकार दिला. कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तान आयसीजेच्या निर्णयाचे पालन करण्याचा भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कुलभूषण जाधव यांना वाचवण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित भारतात परत आणण्यासाठी भारत सर्वतोपरी प्रयत्न करेल,” असे परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी