संत सावता माळी हे नामदेवकालीन संत कवी. त्यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरच्या जवळ अरणभेंडी या गावात शके ११५२ मध्ये झाला. त्यांच्यामुळे अरणभेंडी हे क्षेत्र झाले. त्यांच्या पित्याचे नाव परसूबा, आईचे नाव नांगिताबाई. पत्नीचे नाव जनाबाई. अरणभेंडी येथे ज्या मळ्यात सावता माळी भाज्या पिकवता पिकवता विठ्ठलभक्ती करत, त्या मळ्यातच विठ्ठलाला पाहत. त्यांनी त्यांचा देहदेखील त्या मळ्यातच विठ्ठलाचे नाम घेत ठेवला. त्या ठिकाणी समाधिमंदिर बांधण्यात आले आहे. पंढरपूरला जाताना भक्तमंडळी आवर्जून अरणभेंडी येथे थांबतात आणि सावता महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतात. संत सावता माळी यांनी त्यांच्या अभंगांमधून आणि जगण्यामधून कर्म हाच ईश्वर हा संदेश महाराष्ट्राला दिला.
संत सावता माळी यांनी हे सांगितले, की परमेश्वराची आराधना करताना भाव महत्त्वाचा असतो. मूर्तिपूजा आणि कर्मकांड यांपेक्षा भक्तिभाव हा खरा. त्यांनी मानवता धर्म हा महत्त्वाचा मानला.
सावता माळी यांनी त्यांचा ‘माळ्या’चा धर्म आचरत, शेती करत करत परमेश्वराची आराधना केली. शेतात भरपूर कष्ट करावेत, लोकांना खरा मानवता धर्म समाजावून सांगावा. त्यांच्या मनातील अंधश्रद्धांचे तण उपटून काढून समाजमनाची मशागत करावी, समाजात जागृती करावी या हेतूने सावता माळी अभंग लिहीत, कीर्तन करत. सावता माळी हे बंडखोर, कर्ते सुधारकच होते असे म्हणावे लागेल.
सावता माळी यांच्या गावाजवळ पंढरपूर आहे, परंतु ते कधीही पंढरपूरला जात नसत. सावता यांना तेथील संतांच्या मांदियाळीत सामील होण्याची इच्छा झाली नाही. त्यांना वाटे, की ते जातीचे माळी आहेत. त्यामुळे त्यांनी मनापासून शेतीत-मातीत राबावे, पिकांची मशागत करावी, गाईगुरांना प्रेमाने सांभाळावे. शेतीला पाणी द्यावे, चांगले भरघोस पीक काढावे, अडल्यानडल्यांना मदत करावी हीच खरी पांडुरंग भक्ती आहे अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे ते शेतीत रमत. ते शेती सोडून कुठेच कधी गेले नाहीत.
एके दिवशी, पंढरपूरला जाणाऱ्या वारक-यांची दिंडी त्यांच्या शेताजवळच्या रस्त्यावरून चालली होती. सावता माळी यांनी त्यांच्या भजनांचा, टाळमृदंगाचा आवाज ऐकला आणि ते शेतातून बाहेर आले. त्यांनी त्या वारकऱ्यांची पाणी, भाकरी, फळे, फुले देऊन पूजा केली. निघताना सावता यांनी त्यांच्या पायांवर डोके टेकवले व ते म्हणाले, “पंढरपूरला निघाला आहात. पांडुरंगाला माझाही नमस्कार सांगा.” वारकरी चकित झाले. त्यांना वाटले, अरणभेंडी तर पंढरपूरच्या वाटेवरच, किती जवळ आहे, मग ते त्यांच्याबरोबर का येत नाहीत? त्यांनी त्यांच्या मनातील शंका सावता यांना विचारली. तेव्हा सावता माळी उद्गारले, “मी कसा येऊ? मी आलो तर देव माझ्यावर रुसेल. मला रागवेल.” वारक-यांनी विचारले, “का रागावेल?” त्यावर सावता माळी यांनी सांगितले, “अहो, माझा पांडुरंग या शेतात राहतो. या शेतात-मळ्यात राबणे, भाज्या-फळे पिकवणे, वाटसरूला भाकरी देणे हीच माझी विठ्ठलभक्ती. हा मळा हेच माझे पंढरपूर! ही ज्वारीची ताटे म्हणजे माझ्या पांडुरंगाची कमरेवर हात ठेवलेली जिवंत रूपे आहेत. ही सळसळणारी पाने, ही उडणारी पाखरे, हे झुळझुळ वाहणारे पाणी विठ्ठलभक्तीचीच तर गाणी सदासर्वदा गात आहेत. हे सर्व येथे, या मळ्यात आहे, तर मी पंढरपूरला येऊन काय करू? ”
त्यांचे हे बोल ऐकून वारकरी खजील झाले. पांडुरंग केवळ मूर्तीत नाही तर आपण जे रोजचे काम करतो ते हसतमुखाने, मनापासून करण्यात पांडुरंगाची खरी भेट होते. असा संदेशच सावता माळी यांनी त्यांना दिला होता! संत एकनाथ त्यांच्याविषयी म्हणतात, “एका जनार्दनी सावता तो धन्य | तयाचे महिमान न कळे काही” ज्ञानदेव-नामदेव यांच्याबरोबर ते तीर्थयात्रेला गेले होते. त्यांना संत ज्ञानदेव-नामदेव यांचा सहवास लाभला. त्यांचे भावविश्व नामदेवांच्या उपदेशाने भारावून गेले होते. त्यांची दृढ श्रध्दा कर्मावर होती. ज्ञानेश्वरांनी सावता माळी यांना ‘भक्ती, कर्माचे आगर’ असे संबोधले आहे. संत सावता माळी यांच्या जीवनात भक्ती आणि कर्म यांचा मनोज्ञ संगम झाला होता. श्रीकृष्णाने गीतेत सांगितलेला कर्मयोग त्यांनी आचरणात आणला. ईश्वरदत्त कार्य निष्ठेने, श्रद्धेने, मनापासून करणे म्हणजे खरी ईश्वराची सेवा आहे. भक्ती आहे. कर्माशिवाय धर्म घडत नाही, भगवंत भावाचा भुकेला आहे, कर्मकांडाचा नाही, हा मौलिक विचार त्यांनी त्यांच्या अभंगांतून प्रभावीपणे मांडला आहे. कामात देव पाहणारा तो कर्मयोगी संत म्हणतो.
कांदा, मुळा, भाजी | अवघी विठाई माझी ||
लसुण, मिरची, कोथिंबिर | अवघा झाला माझा हरी ||
अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
आमुचि माळियाची जात | शेत लावू बागाईत ||
आम्हा हाती मोट नाडा | पाणी जाते फुलझाडा ||
चाफा, शेवंती फुलली | प्रेमे जाईजुई व्याली ||
सावताने केला मळा | विठ्ठल देखियला डोळा ||
असे अभंग गात सावता महाराज त्यांच्या मळ्यात अखंड काम करत असत. पिकांना पाणी देताना, खुरपताना मुखाने अखंड हरिनाम घेत असत, म्हणून त्यांच्या जीवनात शांतता होती.
अरणभेंडी गावात त्यांच्याविषयी एक आख्यायिका सांगितली जाते. ती दंतकथा अशी आहे, की पैठणच्या कूर्मदास या अपंग भक्ताच्या बोलावण्यावरून प्रत्यक्ष विठ्ठल त्याला भेटण्यास निघाले असताना, वाटेत ते सावतोबाच्या मळ्यात थांबले. त्यांनी बरोबर संत ज्ञानेश्वर व संत नामदेव यांनाही घेतले होते. विठ्ठलाच्या मनात नामदेवांना भक्तीची पराकाष्ठा किती असते ते दाखवायचे होते. विठ्ठल त्या दोघांची नजर चुकवून सावता माळी यांच्यासमोर उभे राहिले आणि त्यांनी सावतोबांना घट्ट मिठी मारली. म्हणाले, “सावतोबा, माझ्या मागे दोन चोर लागलेत. मला पटकन् कोठेतरी लपव.” त्यावर सावतोबा म्हणाले, “देवा, अशी कोणती जागा आहे, जेथे तू कोणाला दिसणार नाहीस?” विठ्ठल म्हणाले, “मग तू मला तुझ्या उदरात लपव.” त्याबरोबर सावता माळी यांनी खुरपे घेऊन आपले पोट फाडले व देवास त्यात लपवले! इकडे, देवाचा शोध घेत घेत ज्ञानदेव, नामदेव सावता महाराजांपाशी आले आणि म्हणाले, “आमचा देव पाहिला आहे का तुम्ही?” सावता माळी यांनी काहीच उत्तर दिले नाही. नामदेवांनी देवाचा धावा सुरू केला. ते विठ्ठलभेटीसाठी व्याकूळ झाले. विठ्ठलाला ते पाहवेना. त्यांनी सावतास सांगितले, “काढ रे मला बाहेर, माझ्या वियोगाने त्याचा जीव जाईल.” तेव्हा सावतोबाने पुन्हा खुरप्याने पोट फाडून पांडुरंगास बाहेर काढले! सावतोबांना त्यांच्या उदरात प्रत्यक्ष विठ्ठलाने वास केला याचा परमानंद झाला. त्यांनी तो
‘सर्व सुखाचे सुख निर्मळ | कैसे दिसत आहे श्रीमुख निर्मळा ||
सावत्या स्वामी परब्रम्हपुतळा | तनुमनाची कुरवंडी ओवाळा ||’
अशा शब्दांत व्यक्त केला.
संत सावता महाराज आजारी पडल्यावर, त्यांनी सर्व गोष्टींचा त्याग केला आणि ते अखंड नामस्मरण करू लागले. त्यांनी त्यांचा देह पांडुरंगाला अर्पण करण्याचा निश्चय केला आणि ते शके १२१७ मध्ये आषाढात पांडुरंगचरणी विलीन झाले! अरणभेंडी या गावात सावता महाराजांच्या शेतातच त्यांचे समाधिमंदिर बांधण्यात आले. त्यांनी मळ्यात जेथे देह ठेवला तेथेच त्यांच्या स्मृती जतन करून ठेवल्या गेल्या.
सावता यांच्यासारख्याच साधेपणाने त्यांचे समाधिमंदिर उभे आहे. गाभाऱ्यात विठ्ठल-रखुमाईची आणि सावता महाराजांची प्रसन्न मूर्ती आहे. सावतोबांचे अभंग भिंतीवर चारी बाजूंनी कोरलेले आहेत. वीणाधा-याच्या वीणेच्या झंकारात अहोरात्र मंदिर भरून जाते. लोक विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतात, सावता महाराजांच्या मूर्तीच्या पायांवर मस्तक टेकवतात, वीणाधाऱ्याच्या पुढे झुकतात आणि प्रसादाचे साखरफुटाणे खात खात, सावतोबांच्या अभंगांचे वाचन करतात. प्रपंच आणि परमार्थ एकच असल्याचे म्हणणारे, कांदा-मुळा, भाजीत विठ्ठल पाहणारे, मोट-नाडा-विहीर-दोरी यांनी अवघी पंढरी व्यापली आहे असे म्हणणारे सावता माळी त्यांना अभंगा अभंगातून भेटत राहतात. देवळातून मागच्या दरवाज्यात आले, की सावता यांच्या हिरव्यागार शेताच्या, निळ्याभोर आभाळाच्या पार्श्वभूमीवर भलामोठा वृक्ष सळसळत असलेला त्यांना दिसतो आणि त्या वृक्षावर किलबिलाट करत थव्याथव्यांनी उतरणारे पोपट, इतर पक्षी बघून आणि तेथील नीरव, शांत, प्रसन्न वातावरणात केवळ त्या वृक्षाची सळसळ आणि पक्ष्यांची गोड किलबिल ऐकत माणसे घटका-दोन घटका समाधिमग्न होतात. जणू तो मळा, ते आकाश, ती भल्यामोठ्या वृक्षाची सळसळ आणि पक्ष्यांचा किलबिलाट यांतून त्यांना सावता माळी यांचा पांडुरंगच भेटायला आलेला असतो.