शासनच्या आदेशाला केराची टोपली, बंदचे आदेश असूनही सर्व दुकाने खुली

14

राजगुरूनगर दि.२४ जुलै २०२० : खेड तालुक्यात कोरोना रोगाचा संसर्ग हा झपाट्याने वाढत असून यामुळे दिनांक १३ जुलै रोजी संजय तेली, उपविभागीय अधिकारी खेड, यांनी आदेश काढला होता. त्या अनुषंगाने दिनांक १४ जुलै ते २४ जुलै या दरम्यान तीन नगरपरिषदा व १८ गावे कंटेन्मेंट झोन करून आवश्यक सेवा वगळता बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र हाच आदेश संपायच्या अगोदर दिनांक २२ जुलै रोजी खेड तहसीलदार सुचित्रा आमले यांनी हा आदेश पुढील पाच दिवस वाढवला असल्याचा आदेश देण्यात आला.

म्हणजे २४ जुलै ते २८ जुलै पर्यंत कालावधी असतानाच दिनांक २४ जुलैला सकाळपासून राजगुरुनगर शहरातील सर्व आस्थापना, दुकाने ही खुली करण्यात आली.

नेमका हा आदेश कोणासाठी आहे? असाही सवाल आता नागरिक विचारत आहेत.तहसीलदार खेड यांनी दिलेला आदेश गट विकास अधिकारी पंचायत समिती खेड तालुका , आरोग्य अधिकारी पंचायत समिती खेड व मुख्याधिकारी राजगुरुनगर , चाकण आणि आळंदी यांना देण्यात आला असून आळंदी शहर व चाकण शहर हे पूर्णतः बंद असून फक्त राजगुरूनगर शहरातच या आदेशाची पूर्तता केलेली दिसत नसून कोरोनाचा संसर्ग वाढल्यास जबाबदार कोण असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

खेड तालुक्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत असून ही संख्या ८७८ झाली असून १६ जणांचा मृत्यू झाला आहे , त्यामुळे हा वाढत असलेला संसर्ग प्रशासनाची डोकेदुखी झाली आहे.

याला उपाययोजना करणे कठीण होत असताना नागरिकांनी शासनाच्या नियमाचे पालन करणे गरजेचे आहे .याबाबत तहसीलदार सुचित्रा आमले यांच्या सोबत संपर्क होऊ शकला नाही ,मात्र उपविभागीय अधिकारी अतिरिक्त सुनिल गाडे यांनी नवीन कन्टेंमेंट झोन करण्यात येणार असून प्रतिबंधित क्षेत्र वगळून शिथिल करण्याबाबत आदेश तयार करण्याचे काम सुरू आहे अशी माहिती दिली. मात्र सोशल मीडियावर दुकाने खुली करण्याबाबत खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील व अतिरिक्त पदभार असलेले उपविभागीय अधिकारी सुनील गाडे यांच्या सोबत व्हॉट्सप वरून नवीन आदेश तयार करण्याचे असल्याची माहिती दिली.

त्यानुसार दुकाने सुरू करणेबाबत सोशल मिडियावर पोस्ट फिरल्याने आज सर्व दुकाने खुली झाल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

न्युज अनकट प्रतिनिधी :
सुनिल थिगळे.