औरंगाबाद, दि. २५ जुलै २०२०: सध्या देशात आणि राज्यात कोविड -१९ चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. बघता बघता भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. मात्र अशा संकटाच्या काळात देखील काही रुग्णालय रुग्णांकडून आवाजावी बिल आकारत असल्याचे निदर्शनास आले आहे. दिवसागणिक रुग्णांच्या देखील आता अशा तक्रारी येण्यास सुरुवात झाली आहे. यासंदर्भात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एक मोठे विधान केले आहे ते म्हणाले आहे की, कोविड -१९च्या काळात अवाजवी बिल आकारणाऱ्या हॉस्पिटल्सवर आमची करडी नजर आहे. सध्या ते औरंगाबाद दौऱ्यावर आहेत यादरम्यान त्यांनी असे वक्तव्य केले.
औरंगाबाद शहरामध्ये दिवसेंदिवस कोविड -१९ चा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्या अनुषंगाने राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे औरंगाबाद दौऱ्यावर गेले आहेत. औरंगाबाद मधील घाटी रुग्णालयाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी असे वक्तव्य केले. याबाबत बोलताना पुढे म्हणाले की, रुग्णांकडून अवाजवी बिल आकारणाऱ्या रुग्णालयांवर सरकारची करडी नजर आहे, तसेच असे आढळल्यास संबंधित रुग्णालयावर कडक कारवाई देखील केली जाणार आहे.
पुढे ते म्हणाले की, औरंगाबाद मध्ये दिवसेंदिवस कोविड -१९ प्रभाव वाढत चालला आहे. आतापर्यंत औरंगाबाद मध्ये एक लाखापेक्षा जास्त चाचण्या करण्यात आल्या आहेत ही चांगली गोष्ट आहे. याआधी औरंगाबाद मध्ये रुग्ण दुपटीने वाढण्याचा वेग १४ दिवसांवर होता. त्यामध्ये सुधारणा होऊन आता तो २६ दिवसांवर गेला आहे. तसेच घाटी रुग्णालयात जी रिक्त पदे असतील ती तातडीने भरण्यात यावी असे आदेश देखील देण्यात आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी