कर्जत, दि. २७ जुलै २०२०: साप……। ! नुसते नाव जरी ऐकले तरी अनेकांची भीतीने धडकी बसती,अनेक काठ्या त्याला मारायला समोर येतात. त्याचा एक दंश सुद्धा मानवास वा इतर प्राण्यास पृथ्वीलोकातून यमलोकात पाठवू शकतो. पण हे खरे तर विषारी सापांचे बाबतीत असते. साप हा निसर्गातील एक अद्भुत प्राणी आहे. हात, पाय, कान इ. अवयव नसताना सुद्धा त्याची भक्ष पकडण्याची व वेगाने पळण्याची क्षमता अद्भुत असते. खरे तर साप हा निसर्गातील अतिमहत्त्वाचा घटक आहे. मानवी वस्तीत साप असणे हे पर्यावरण पुरकच आहे , कारण एकूण अन्नधान्याच्या ३५% धान्य नष्ट करणा-या उंदीर व घुशींची संख्या नियंत्रित ठेवण्याचे तसेच निसर्गात पक्षी , किटक, यांची संख्यासुद्धा नियंत्रित करण्याचं महत्त्वाचं कामं ते करीत आसतात.मानव ज्या घटकाला भितो ते म्हणजे सापाचे विष. सापाचे विष हे कँन्सर, महारोग, इत्यादींवर वेदनाशामक म्हणून तर अनेक रोगांवर, तसेच प्रतिसर्पविष बनवायला सापाचे विष आवश्यक असते. कोणता साप विषारी व कोणता बिनविषारी हे समजल्यावर व थोड्या काळजीने आपण सर्पदंशचा आकडा कमी करू शकतो. जगात २७०० जातीचे साप आढळत असून , भारतात २७८ जातींचे साप आढळतात . त्यात खूप कमी साप विषारी , काही सौम्यविषारी तर बहुसंख्य साप हे बिनविषारी प्रजातीचे आहेत , ज्यांच्या दंशाने मानवास अपाय होत नाही.
सापांबाबत आपल्या मनात अनेक प्रकारचे गैरसमज असल्यामुळे नाहकच आपण सापांची हत्या करीत आलेलो आहे. भारतात बहुतेकदा सर्पदंश हे मानवाच्या बेजबाबदार पणामुळे होत असतात.सापांबद्दलचे जनमाणसांत पसरलेले गैरसमज,अज्ञान, मांत्रीकाकडे उपचार करण्यात खर्ची पडलेला वेळ तसेच रुग्णालयात पुरेशा एएसव्ही किंवा इतर सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अनेक वेळा रुग्ण दगावतात. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी आपल्या जवळच्या ग्रामीण रुग्णालयात एएसव्ही उपलब्ध आहे की नाही याची शहानिशा करणे गरजेचं आहे.
आपल्या घरांत किंवा आजूबाजूच्या परीसरात साप वा इतर जखमी पशु-पक्षी आढळल्यास जवळच्या सर्पमित्रांस संपर्क करा. ते येईपर्यंत सापावर लक्ष ठेवा . आपला एक काँल एका मुक्या जिवाची व प्रसंगी घरातील लोकांचे प्राण वाचवू शकतो. नागपंचमी निमित्त आपण सर्वजण सर्पसंवर्धनाचा संकल्प करुन , पर्यावरण संवर्धनास हातभार लावूया .
सापांविषयी अंधश्रद्धा व गैरसमज
१) नागास मारल्यास नागिन बदला घेते ?
उत्तर – मिलनाचा काळ सोडला तर नाग नागिन कधीच एकत्र येत नाहीत, त्यामुळे बदला घेण्याचा प्रश्नच येत नाही. सापाची स्मरणशक्ती विकसित नाही त्यामुळे त्यास स्मरणात राहत नाही. मारलेला साप हे नाग की नागिन हे ओळखता येत नाही कारण नागाचे जननेंद्रीय हे शरिरच्या आत असते व निसर्गात नागासारखे दिसणारे धुळ नागिण व धामण इ . साप आहेत.
२) अजगर माणसाला गिळते ?
उत्तर – इतर सापांपेक्षा अजगर हा लांबी रुंदीला मोठा असल्यामुळे हा गैरसमज पसरला असावा,त्याचे खाद्य घुशी ,कुत्रे,वासरु, ससे , हरीण डुकराची पिल्ले , मगरींची पिल्ले हा आहे त्यात मानवाचा समावेश नाही.
३) नाग पुंगीवर डोलतो ?
उत्तर – नागाला किंवा इतर सापांना बाह्यकर्ण नसतात,त्यामुळे तो गाणे वा इतर ध्वनी ऐकू शकत नाही. तर तो हलणाऱ्या वस्तूवर हल्ला करण्याच्या पावित्र्यात ती वस्तू हलते तिकडे तो आकर्षित होतो.. पुंगीच्या जागी रूमाल किंवा हाताची मूठ धरली तरी नाग तिकडे आकर्षित होतो.सापांत फक्त नाग जातींचे साप फणा काढतात म्हणून गारुडी नागाचाच खेळ करतात.
४) ईच्छाधारी नाग असतो ?
उत्तर – नागाला १०० वर्षे झाली की तो इच्छाधारी होतो व त्याला केस येतात असा समज आहे ,खरे तर नागच काय तर इतर सापसुद्धा १०० वर्षे जगल्याची उदाहरण नाही. नाग हे फक्त १६-२० वर्षेच जगू शकतात, तेही एखाद्या सर्पोद्यानातच, कारण निसर्गात सापाचे मुंगूस, घार, गरूड , मोर , ससाणा व सर्वात मोठा शत्रू माणूस इ. अनेक शत्रू आहेत. (कमी लांबीचे साप कमी तर जास्त लांबीचे साप जास्त वर्ष जगतात.. अजगर साप ३३-३५ वर्ष जगल्याची नोंद आहे.)
५) नागमणी_असतो ?
उत्तर – ही एक दंतकथा आहे. गारुडी काचेचे मणी , पाणी व रक्त शोषणारे दगड किंवा बेंझाईनचे तुकडे नागमणी म्हणून विकतात जर नागमणी असते तर त्याने गारुडी लोक धनाढ्य झाले असते व आज जगात गारुडी लोकच श्रीमंत राहिले आसते.
६) नागाला केस असतात ?
उत्तर – साप हा सस्तन प्राणी नाही त्यामुळे त्याच्या अंगावर केस नसतात. गारुडी लोक नागाच्या डोक्यावर चाकूने खाच पाडून त्यात कुत्रा , शेळीच्या शेपटीची केस रोवतात.
६) साप दूध पितो ?
उत्तर – दूध हे सस्तन प्राण्यांचे पेय आहे व साप हा सस्तन प्राणी नाही. गारुड्यांकडे असणारे नाग हे खूप दिवस आधी पकडून त्यांचे विषारी सूळे काढून त्यांचे तोंड शिवून त्यास अंधा-या खोलीत काहीही खायला न देता ठेवले जाते. लक्षात ठेवा दूध हे सापाचे पेय नाही. ते पिल्याने सापास आतड्याची व फुफ्फुसांचे रोग होतात. भक्तीपोटी आपण नकळत एका जिवाची हत्या करत असतो.
७) मंत्राने विष उतरते ?
उत्तर – आपल्याकडील काही मोजके( Big four) साप सोडले तर काही साप निमविषारी तर बहुसंख्य साप बिनविषारी असून त्यांच्या दंशाने इतर प्राण्यास काही होत नाही.
दंश झालेली व्यक्ती मानसिक धक्यात असते त्यावर विषाचा प्रभाव नसतो व अशा वेळी मांत्रिकाचे फावते.
८) नाग व धामण सापाचे मिलन होते..?
उत्तर :- प्रत्येक सापाचे मीलन हे स्वजातीतच होत आसते. नाग व धामण हे परस्पर भिन्न प्रजातीचे साप असल्यामुळे नाग व धामणचे मीलन होत नाही .
९) मांडूळ जातीच्या सापाच्या शरीरात हाडे नसतात..?
उत्तर :- प्रत्येक सापाच्या शरीरात दोनशे-ते चारशे बरगड्या आसतात.
१०) अजगर श्वासाद्वारे भक्ष ओढून घेतो..?.
उत्तर:- अजगर श्वासाद्वारे नाही तर भकावर्ष झडप मारुन पकडतो.
११) अजगर झाडाला विळखा घालून गिळलेल्या भक्षाची हाडे मोडतो..?
उत्तर:- अजगर साप भक्षाला गुदमरुन मारतो. अजगर भक्ष गिळल्यानंतर झुडपात किंवा लपणमधे निपचीत पडून राहतो. जर अजगराने झाडास विळखा घातला तर भक्षाचे हाडे तर मोडतीलचं पण सापाची कातडी फाटण्याची पण भिती आसते. अजगराच्या जठरामधे भक्षाची हाडे विरघळवून टाकण्याची क्षमता आसते.
१२) साप चावल्यास मोह,मिरची व कडुलिंब सुद्धा गोड लागतो..?
उत्तर:- सर्पदंशानंतर दंश जर विषारी सापाचा असेल तर विषाच्या प्रभावाने जीभेला संवेदना राहत नाय व त्यामुळे कोणत्याही गोष्टीची चव रुग्णास कळत नाही.
साप वाचवा निसर्ग वाचवा
न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष