उस्मानाबाद, २८ जुलै २०२०:उस्मानाबाद येथील एआयएमआयएमच्या वतीने बकरी ईदच्या निमित्ताने एक दिवसासाठी शेळ्यांचा बाजार भरवण्यासाठी शेळी पालकांना परवानगी देण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना निवेदन देऊन केलेली आहे. शेळी पालन हा शेतीला जोडधंदा असल्यामुळे कित्येक शेतकरी शेळी पालन करतात. गरज भागवण्यासाठी ते शेळी विकून आपल्या अडचणीवर तोडगा काढतात.
बकरी ईदच्या वेळी बकऱ्यांना चांगला भाव येत असतो, या कारणाने ते वर्षभर बकऱ्यांचा चांगल्या रितीने सांभाळ करतात. कोरोनाच्या या महामारीच्या काळात आधीच आर्थिक अडचणींना मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागलेले आहे. तरी शेळी पालकांचा विचार करत त्यांना एक दिवसासाठी जरी शेळ्यांचा बाजार भरवण्यास परवानगी दिली तर त्यांचा नक्कीच फायदा होईल. अन्यथा, अत्यंत क्षुल्लक भावात त्यांना शेळ्या विकाव्या लागतील, आणि यामुळे नक्कीच त्यांना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
रमजान ईदच्या वेळी मुस्लिम समुदायाने घरातच राहून ईद साजरी करत प्रशासनास सहकार्य केले होते.मात्र, या ईद मध्ये प्रतिकात्मक रित्या ईद साजरी करता येत नाही. यामुळे काही अटी आणि शर्थी घालून तसेच सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करून या लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात शासनाद्वारे देण्यात येणाऱ्या नियमानुसार ईदगाह मध्ये नमाज पठण करण्यासाठी परवानगी बहाल करण्यात यावी.
यासोबतच, पोलीस प्रशासनास देखील सहकार्य करण्यासंबंधी आदेशीत करावे अशा प्रकारचा उल्लेख जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना एआयएमआयएम पक्षाच्या वतीने दिलेल्या निवेदनात केला आहे.
एआयएमआयएमचे शहराध्यक्ष अजहर सय्यद, जिल्हा प्रवक्ता शहबाज काझी, युवा शहराध्यक्ष अल्फैज शेख, समाज सेवक आसेम काजी, सीनियर लिडर मुस्तफा खान, माजी शहराध्यक्ष मोसिन शेख, आरेफ नाईकवाडी, खावेर शेख, आणि इतर एआयएमआयएम पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये संबंधित निवेदन देण्यात आले.
न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड