लॉकडाउनचा कालावधी ३१ ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आला आहे – जिल्हाधिकारी दिपा मुधोळ – मुंडे

उस्मानाबाद, दि. ३ ऑगस्ट २०२० : उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव अतिशय झपाट्याने वाढत चाललेला आहे. या वाढत्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी, आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी, या गंभीर परिस्थितीमध्ये जिल्हाधिकारी दिपा मुधोळ – मुंडे यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील लॉकडाउन हे ३१ ऑगस्ट पर्यंत वाढवले असल्याचे सांगितले आहे.

आज दिनांक २ ऑगस्ट रोजी, जिल्हाधिकारी यांनी काढण्यात आलेल्या आदेशानुसार, जिल्ह्यामधील कोरोनाचा संसर्ग वाढतच जात असल्यामुळे, यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून लॉकडाउनचा कालावधी ३१ ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आलेला असून, नागरिकांनी या कालावधीत मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे हे अनिवार्य करण्यात आलेले आहे. नागरिकांनी तोंडावर मास्क किंवा रुमालचा वापर करणे, तसेच चेहरा झाकणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, दुकानांमध्ये एका वेळी ५ पेक्षा अधिक व्यक्तींनी उपस्थित राहू नये, ग्राहकांत योग्य ते अंतर ठेवावे, याबाबत पूर्ण दक्षता घेणे हे बंधनकारक करण्यात आले आहे. यासोबतच, सार्वजनिक मेळावे, समारंभाला निर्बंध घालण्यात आलेले असून, विवाह समारंभात ५० तर अंत्ययात्रेत २० यापेक्षा अधिक जणांना परवानगी नाकारण्यात आलेली आहे.

सार्वजनिक ठिकाणी मद्य, तंबाखू, पान, गुटखा इत्यादी पदार्थांचे सेवन करण्यास मनाई आहे. सर्व प्रवेश तसेच निर्गमनाच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंग करणे, हँन्डवाश व सॅनिटाइजर उपलब्ध करून देणे आवश्यक करण्यात आले आहे. शक्य असेल ते काम घरातूनच करावे, (वर्क फ्रॉम होम) या पद्धतीचा शक्य असेल तिथे वापर करावा. सर्व अत्यावश्यक दुकाने, सेवा नियमित अनुज्ञेय हे वेळेनुसार सुरू राहणार आहेत. तसेच, जिल्हा अंतर्गत बससेवा योग्य ते शारीरिक अंतर ठेवून आणि निर्जंतुकीकरणाच्या उपाययोजनेसह पन्नास टक्के आसन क्षमतेने सुरू राहील. यासोबतच, आंतर जिल्हा प्रवासी वाहतुकीवरील निर्बंध हे कायम ठेवण्यात आलेले आहेत.

अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर सर्व दुकाने, बाजारपेठा सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत चालू राहणार आहेत. याची अंमलबजावणी ही ५ ऑगस्ट पासून करण्यात येईल. शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक, प्रशिक्षण, कोचिंग क्लासेस इत्यादी संस्था बंदच राहणार आहेत. तसेच, अटी व शर्ती सह केशकर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर हे सुरू राहणार आहेत. दुचाकी वर २ ,तीन चाकी वाहनात ३ तर चार चाकी वाहनात ४ प्रवाशांची मुभा आहे.

जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या वरील आदेशाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई होणार असल्यामुळे, सर्वांनी लॉकडाउन कालावधीत नियमांचे काटेकोर पणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन देखील  करण्यात आलेले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रगती कराड.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा