कमी मार्क मिळाले म्हणजे आमदार होण्याची संधी: रोहित पवार

16

कर्जत, ६ ऑगस्ट २०२०: स्वतः वर विश्वास असेल, कुटुंबावर विश्वास असेल व आत्मविश्वास बाळगून कष्ट घेतले तर नक्की वेगळ्या क्षेत्रात यश मिळविता येते त्यामुळे ज्यांना कमी मार्क मिळाले असतील त्यांना तुमच्या आमदारांचे उदाहरण दाखवा, असे म्हणत कमी मार्क पडले आहेत घाबरू नका तुम्हाला आमदार होण्याची संधी आहे असे उदगार आज कर्जत येथे आमदार रोहित पवार यांनी इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी काढले.

कर्जत तालुक्यातील दहावी व बारावी मधील सायन्स, आर्ट व कॉमर्स मध्ये तालुक्यात आलेल्या पहिल्या तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आज श्री अमरनाथ विद्यालय कर्जत या ठिकाणी  आमदार रोहित पवार यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता.  कार्यक्रमासाठी यशवंत शिक्षण संस्थेचे सचिव उमेश लांगोरे, रवी पाटील, किरण पाटील, दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळ कांबळे, अमरनाथ विद्यालयाच्या प्राचार्य पुष्पावती सोनवणे, महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य संतोष पोटरे, डॉ प्रकाश भंडारी, गजानन चावरे, संतोष म्हेत्रे, सचिन सोनमाळी, आदी उपस्थित होते. यावेळी या विद्यार्थ्यांचा सत्कार पालकांसह करण्यात आला.

आ. रोहित पवार यांनी यावेळी बोलताना गुणवंत विद्यार्थ्यांनी जे यश मिळविले आहे त्याचे कौतुक करताना यापुढे आपण वेगवेगळ्या क्षेत्राचा अभ्यास करून त्यामध्ये आपल्या ध्येया प्रमाणे मार्गक्रमण करावे, याच बरोबर ज्यां आपल्या मित्र मैत्रिणीना कमी गुण मिळाले आहेत त्यांना धीर देण्याचे ही काम करा असा सल्ला दिला.

आपण अधिकारी झालात तर आपल्याच मतदार संघात आपल्याला आणण्याचे मी काम करीत व ज्यांना व्यवसाय टाकायचा आहेत त्यानी एम आय डी सी मध्ये प्रकल्प उभारावा, असे म्हणत विद्यार्थ्यांच्या पालकांचे ही कौतुक केले. शेवटी उपमुख्याध्यापक डी. आर. जगताप यांनी आभार मानले सूत्र संचलन अरविंद हिंगसे यांनी केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष