सोलापूर, ७ ऑगस्ट २०२० : सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन वेळोवेळी नियमांनुसार काही बदल लागू करत आहे. पंढरपूर तालुक्यातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाकडे लक्ष देता, जिल्हा प्रशासनाने पंढरपूर सोबत आसपासच्या काही गावांमध्ये ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून ते १३ ऑगस्ट २०२० च्या मध्यरात्री पर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नागरिकांना कोरोनाच्या या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नागरिकांना केलेले आहे.
पंढरपूर तालुक्यातील कोरोना वर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक प्रशासन, तसेच लोकप्रतिनिधींशी चर्चा करून सर्वांच्या हितासाठी संचारबंदीचा हा निर्णय घेण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा, तसेच दूध वितरण सुरू राहणार आहे. तरी, नागरिकांनी या काळात आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नये. संचारबंदीच्या या कालावधीत रॅपिड अँन्टीजेन टेस्ट मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहेत; तरी, हे काम करणाऱ्या पथकास सहकार्य करा, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा, आपली टेस्ट जर का पॉझिटिव्ह आली तर आपल्या वर इलाज करणे सोयीस्कर होणार आहे यामुळे टाळाटाळ करू नका,असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले आहे.
मास्कचा, रुमालाचा वापर करून चेहरा झाका, सुरक्षित अंतर ठेवून राहा, हात साबणाने स्वच्छ धुवा. ताप, कोरडा खोकला अथवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर घाबरून न जाता तातडीने रुग्णालयात दाखल होऊन उपचार करून घ्या. कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाली तर जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधा.
घाबरू नका पण जागरूक रहा. आणि या काळात प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन देखील जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नागरिकांना केले आहे.
न्यूजअनकट प्रतिनिधी- प्रगती कराड.