बीजेएस करणार १५ ऑगस्ट पर्यंत ५००० प्लाज्मा डोनर्सची यादी शासनाकडे सुपूर्द

कर्जत, ७ ऑगस्ट २०२०: भारतीय जैन संघटनेच्या वतीने १५ आॅगस्टपर्यंत महाराष्ट्रातुन ५००० प्लाज्मा डोनर्सची यादी शासनाकडे सुपूर्द करण्याचा संकल्प करण्यात आला असल्याची माहिती बिजेएस चे जिल्हाध्यक्ष आशिष बोरा यांनी दिली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या चार महिन्यात भारतीय जैन संघटनेला (बीजेएस) कोरोना संदर्भात महाराष्ट्रातील गावागावात वेगवेगळे कार्य करण्याची संधी मिळाली आहे. या सर्व अनुभवावरून असे दिसते कि कोरोनापेक्षा कोरोनाची भीती लोकांना जास्त त्रासदायक ठरत आहे. वास्तविक पाहता कोरोना झाल्यावर आपण त्यातून बाहेर येऊ शकतो, यावर लोकांचा विश्वास बसणे जरुरी आहे. कोरोनावर मात करून बरे होऊन आलेल्या व्यक्तीचा प्लाज्मा कोरोनाबाधित रुग्णाला दिल्यामुळे आपल्याला जीवनदान मिळू शकते व त्यातून आपण यशस्वीपणे बाहेर येऊ शकतो ही भावना लोकांच्यामध्ये निर्माण होणे आवश्यक आहे.

सध्या केंद्र व वेगवेगळ्या राज्य शासनातर्फे कोरोनाच्या संदर्भात प्लाज्मा थेरपीवरती गेल्या अनेक महिन्यांपासून संशोधन सुरु आहे. या प्रक्रियेसाठी थोडा कालावधी लागू शकतो. या कालावधीत प्लाज्मा डोनर्सला शोधण्याचे व त्यांची संमती घेण्याचे काम सुरु केले तर कोरोना बाधितांवर विनाविलंब ईलाज होऊन त्यांना जीवनदान मिळू शकते.
या अनुषंगाने बीजेएसने संपूर्ण महाराष्ट्रात संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मूथ्था यांच्या संकलनेतून “बीजेएस प्लाज्मा डोनर्स जीवनदाता योजने” च्या माध्यमाने चळवळ उभी केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बीजेएसच्या कार्यकर्त्यांचे नेटवर्क आहे. त्यामुळे प्लाज्मा दान करण्यास पात्र असणाऱ्या ५००० व्यक्तींना प्रोत्साहित करून त्यांचे संमतीपत्र मिळवून शासनाला सुपूर्द करण्याचा निर्णय बीजेएसने घेतला आहे.

यासाठी राज्यामध्ये राज्याध्यक्ष हस्तीमल बंब यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू झाले असून यामध्ये किमान १७ वर्षे पूर्ण किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्ती, कोरोना आजारातून बरे होऊन दोन आठवड्यांपेक्षा जास्त अवधी झाला आहे आणि इतर कोणतेही गंभीर आजार नसलेल्या व्यक्ती प्लाज्मा देण्यासाठी पात्र आहेत. तरी बीजेएसच्या वतीने सर्व कोरोना योद्ध्यांना आवाहन करण्यात येते की महाराष्ट्र कोव्हीड मुक्त करण्यास वचनबद्ध आपण आपला प्लाज्मा दान करून एक पुण्याचे काम करावे.

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना आजारातून बरे झालेल्या रूग्णांनी प्लाज्मा डोनेशन करण्यासाठी संमती पत्र भरुन द्यावे असे आवाहन भारतीय जैन संघटनेचे वतीने करण्यात येत असून अहमदनगर (द) मध्ये संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य आदेश चंगेडिया, सुरेश बाठिया, मनसुखलाल चोरडिया व विभागीय अध्यक्ष विश्वजीत गुगळे याच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष आशिष बोरा व तालुका निहाय जामखेड -अमोल तातेड, कर्जत- प्रसाद शहा, पाथर्डी- श्रेयस चोरडिया, शेवगाव -गौरव पितळे, नेवासा – निखिल शिंगवी, पारनेर -मनोज गांधी, श्रीगोंदा- शुभम मुनोत यांचे सह पदाधिकारी यासाठी विशेष परिश्रम घेत असल्याची माहिती जिल्हा सचिव डॉ उदय बलदोटा, समन्वयक अभय बोरा, कर्जतचे अध्यक्ष विजय खाटेर, यांनी दिली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा