पुणे शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढले, १३१८ संशयित रुग्णांपैकी ९६ जणांना डेंग्यूची लागण

पुणे, ८ सप्टेंबर २०२३ : शहरात डेंग्यूच्या तापात सातत्याने वाढ होत आहे. या वर्षी आतापर्यंत डेंग्यूचे एकूण १,३१८ संशयित रुग्ण आणि ९६ बाधित रुग्ण आढळले आहेत. यातील सर्वाधिक रुग्ण ढोले पाटील आणि औंध-बाणेर विभागीय कार्यालयांतर्गत आढळून आले आहेत. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील डेंग्यूचे ३२ टक्के रुग्ण या दोन भागात आहेत. दरम्यान, शहरात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे.

यावर्षी एप्रिल, मे आणि जून महिन्यात शहरात डेंग्यूचा एकही रुग्ण आढळला नाही. मे आणि जून महिन्यात शहरात पाऊस झाला नाही. त्यामुळे या दोन महिन्यांत एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. मात्र, जुलै महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर शहरात डेंग्यूने थैमान घातलं आहे. जुलैमध्ये एकूण २२५ संशयित आणि १८ बाधित रुग्ण आढळले आहेत. ऑगस्ट महिन्यात १६ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये एकूण ५१२ संशयित आणि ४७ बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. गेल्या आठ महिन्यांत डेंग्यूचे निश्चित निदान झालेल्या ९६ रुग्णांची महापालिकेत नोंद झाली आहे.

मात्र, ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय परीघात सर्वाधिक १६ तर औंध-बाणेरमध्ये १२ रुग्ण आढळले आहेत. यासोबतच येरवडा-कळस-धानोरीमध्ये १०, कसबा – विश्रामबागमध्ये १०, हडपसर-मुंढवामध्ये ९, घोले रोड – शिवाजीनगरमध्ये ७, नगर रस्ता-वडगाव शेरीमध्ये ५, भवानी पेठ ५, वारजे कर्वेनगरमध्ये ४, कोंढवा येथे ३, वानवडी – रामटेकडी २, टिळक रस्ता – सिंहगड रस्ता १, कोथरूड १, केशवनगर १, धनकवडी – सहकारनगर १ रुग्ण आढळले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा