शिवसेनेच्या नगरसेवकाची माणुसकी; पीपीई किट घालून कोरोना रुग्णाला उचलले

कल्याण, दि. ८ ऑगस्ट २०२०: कल्याणमध्ये एक ७० वर्षीय महिला कोरोनमुक्त झाली. मात्र रुग्णालयाने नातेवाईकांकडून अधिक बिलाची मागणी करत रुग्णाला डिस्चार्ज देण्यास नकार दिला. ही बाब शिवसेनेच्या नगरसेवकाला कळवल्यानंतर त्यांनी स्वतः पीपीई किट घालून त्या रुग्णाला थेट हॉस्पिटलच्या बेडवरूनच उचलून आणले.

कल्याणच्या श्रीदेवी हॉस्पिटलमध्ये एक ७० वर्षीय कोरोना बाधित महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. १४ दिवसांच्या उपचारांनंतर ती महिला कोरोनमुक्त झाली. या महिलेला रुग्णालयात दाखल करताना तिच्या कुटुंबीयांनी ८० हजार रुपये डिपॉझिट भरले होते. मात्र रुग्णाला डिस्चार्ज देताना श्रीदेवी हॉस्पिटलने महिलेच्या नातेवाईकांना आणखी ८० हजार रुपये बिल भरण्यास सांगितले. त्यामुळे आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी व्याजाने २० हजार रुपये आणि नगरसेवक महेश गायकवाड यांच्याकडून मदतरूपी १० हजार रुपये असे एकूण ३० हजार रुपये रुग्णाला देऊ केले. मात्र पूर्ण पैसे भरल्याशिवाय डिस्चार्ज देण्यास रुग्णालयाने नकार दिला.

रुग्णालयाच्या आडमुठेपणाला कंटाळून महिलेच्या नातेवाईकांनी पुन्हा शिवसेनेचे नगरसेवक महेश गायकवाड यांच्याकडे मदत मागितली. हॉस्पिटलच्या या आडमुठेपणामुळे संतप्त झालेल्या महेश गायकवाड यांनी थेट श्रीदेवी रुग्णालय गाठले. बिलाच्या रकमेत ४९००० रुपये केवळ पीपीई किट, कचऱ्याची विल्हेवाट आणि अन्य कामांसाठी आकारण्यात आल्याने गायकवाडांनी याचा जाब विचारला. मात्र, रुग्णालयाने त्यांच्याशी हुज्जत घातली. तेव्हा त्यांनी स्वतः पीपीई किट परिधान केले आणि त्या ७० वर्षीय महिलेला थेट हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावरून उचलून हॉस्पिटलच्या बाहेर आणले आणि रिक्षेने घरी पाठवले.

यावेळी महेश गायकवाड यांनी रुग्णालयाकडून आकारण्यात येणाऱ्या भरमसाठ बिलाबाबत रुग्णालय प्रशासनाला खडेबोल सुनावले. काहीकाळ तिथे गोंधळही झाला. पोलिसांच्या मध्यस्तीनंतर प्रकरण शांत झाले. मात्र आपण रुग्णालयाची तक्रार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे आणि राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे असं गायकवाड म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा