विरोधी पक्ष नेत्याच्या नेतृत्वात आम्ही आंदोलनास तयार – संजय राऊत

मुंबई, दि. ९ ऑगस्ट २०२०: महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर असणाऱ्या बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला होता. या पुतळ्याला ग्रामपंचायतीने देखील मान्यता दिली होती. मात्र तरीही कर्नाटक सरकारनं शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवला होता. त्यामुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आणि त्यांनी याचा विरोध केला.

आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांनी त्यांना याबद्दल विचारले असता ते म्हणाले कि, महाराष्ट्र शासनाने याची दाखल घेतली पाहिजे. यासाठी विरोधी पक्षाला देखील विश्वासात घेतेले पाहिजे. कर्नाटकात भाजपचे सरकार आहे. आम्ही महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षनेत्याच्या नेतृत्वात कर्नाटकात आंदोलन करण्यास तयार आहोत,  पण ते येतील का? असा खोचक ठोला राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता  लगावला. कारण फडणवीस हे महाराष्ट्रात भाजप पक्षाचे प्रमुख नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत. त्यामुळे कर्नाटकात असलेल्या त्यांच्याच पक्षाच्या भाजप सरकारविरोधात फडणवीस आंदोलन करतील का असा सवाल करत राऊतांनाही फडणवीसांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी ”कर्नाटक सरकारची दडपशाई खपवून घेणार नाही” अशी भूमिका घेत लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावला नाही तर कर्नाटकात घुसू असा इशारा कर्नाटक सरकारला दिला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा