दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ यंदा गणेश उत्सव करणार साध्या पद्धतीने साजरा

पुणे, १० ऑगस्ट २०२०: येत्या २२ तारखेला म्हणजेच २२ ऑगस्ट रोजी गणेशोत्सव येत आहे. मात्र, दरवर्षीप्रमाणे यावर्षीचा गणेशोत्सव वेगळा असेल. कारण, सध्या देशभरात आणि राज्यभरात कोरोना व्हायरसचे संकट ओढावले आहे. गणेशोत्सव म्हटलं की मुंबई आणि पुणे ही दोन प्रमुख शहरे मानले जातात. त्यातल्या त्यात पुण्यात गणेश मंडळांकडून वेगवेगळे देखावे सादर करून दहा दिवस गणेश उत्सव जोशात साजरा केला जातो. पुण्यातील असेच प्रसिद्ध गणेश मंडळ म्हणजे दगडूशेठ हलवाई गणपती यंदा आपला गणेश उत्सव मंदिराच्या आत मधेच साजरा करणार आहे. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी आज दिली.

गणेशोत्सव संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील गणेश मंडळांना गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत मुंबई व पुण्यातील अनेक मंडळांनी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात आता दगडूशेठ हलवाई मंडळाने देखील आपण साध्या पद्धतीने गणेश उत्सव साजरा करणार असल्याचे जाहीर केले आहे.

ही माहिती एका पत्रकार परिषदेमध्ये गोडसे यांनी दिली. या पत्रकार परिषदेदरम्यान महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, पोलीस सहआयुक्त रवींद्र शिसवे तसेच मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अशोक गोडसे म्हणाले की, “मागील कित्येक वर्षांपासून आपण सर्व उत्साहाच्या वातावरणात गणेश उत्सव साजरा करीत आलो आहोत. मात्र यंदाची परिस्थिती वेगळी आहे. शहरात करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. त्यामुळे शासनाने दिलेल्या आदेशानुसार आपण यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने आणि मुख्य मंदिरात साजरा करीत आहोत. मंदिराच्या बाहेरून भाविकांना दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, दरवर्षी गणेशोत्सवात भाविक गणरायाच्या चरणी मोठ्या प्रमाणावर हार, फुले, नारळ आणि पेढे अर्पण करत असतात. मात्र यंदा ”या वस्तूंचा स्वीकार केला जाणार नाही” असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

तसेच ते पुढे म्हणाले की, “या उत्सव काळात मंदिरात अभिषेक, पूजा, आरती आणि गणेशयाग गुरुजी करणार आहेत. तर भाविकांच्या हस्ते दरवर्षी उत्सव मंडपाच्या ठिकाणी होणारे अभिषेक रद्द करण्यात आले आहेत. मात्र भाविकांनी नाव आणि गोत्र यांची ऑनलाईन नोंदणी केल्यास, गुरुजींमार्फत ऑनलाईन अभिषेक करण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.”

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा