जेजुरीतील तरुणाने दिव्यांग तरुणीशी विवाह करत दिला सामाजिक संदेश

पुरंदर दि.१६ ऑगस्ट २०२०: पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे आज एक आगळावेगळा विवाह सोहळा पार पडला. सुरेश किसन पवार राहणार जेजुरी यांची मूकबधिर कन्या पूनम आणि नानासो यशवंत जराड राहणार वडगावरासई यांचे द्वितीय चिरंजीव भरत यांचा हा आगळावेगळा विवाह सोहळा जेजुरी येथे पार पडला. विशेष म्हणजे या विवाह सोहळ्यात पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी कन्या दान केले.

वधू पूनम ही दिव्यांग (मुकबधीर) असून तिची आयुष्याचा जोडीदार म्हणून निवड करत, आयुष्यभर सांभाळण्याची जबाबदारी, कोणत्याही प्रकारे विकलांग नसलेल्या चि. भरत याने स्वीकारली व संपूर्ण जराड परिवाराने तिचे लक्ष्मीच्या रूपाने स्वागत केले. हे नक्कीच कौतुकास्पद आहे. आज या विवाहसोहळ्यामध्ये कन्यादान आमदार संजय जगताप यांनी केले. यावेळी जगताप म्हणाले की,’ कन्यादान यासारख्या पवित्र कार्याचा मान पोळ कुटूंबियांनी मला दिला हे मी माझे सौभाग्य समजतो’. सदर विवाह सोहळा हा आंतरजातीय देखील होता. वधू-वरांना संसार उपयोगी भांडी शंभुराजे युवा प्रतिष्ठान पुरंदर, दहीहंडी उत्सव समिती सासवड यांनी भेट दिली.

जाती धर्माच्या भिंतीपलीकडे जाऊन मानवी मूल्यांची जपवणूक करत या दोन्ही परीवारांनी या निमित्ताने समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. हा विवाह घडवून आणण्यासाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या महिला अध्यक्षा सुरेखा ढवळ यांनी मध्यस्थी करून ह्या दोन कुटुंबांना एकत्र आणले. विवाह संपन्न होत असताना कायद्याच्या चौकटीत राहून त्यांचे प्रथम कोर्ट मॅरेज करण्यात आले. नंतर वधु-वरांना आमदार संजय जगताप यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. नामदार राज्य मंत्री बच्चुभाऊ कडू यांनी फोन वरून वधूवरांना शुभेच्छा दिल्या.

तिरंगा हाती देऊन राष्ट्रगीताने विवाहाची सुरुवात करण्यात आली. वधू-वरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी पुणे जिल्हा बँकेचे संचालक दिगंबर दुर्गाडे, पुरंदर तालुक्याचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीप पोमण, काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस अध्यक्ष गणेश जगताप, नगराध्यक्षा वीनाताई सोनवणे, सासवड पोलिस स्टेशनचे राहुल घुगे, नगरसेविक रुक्मिणी जगताप, बाळासो दरेकर, अतुल शिर्के, कल्पना गुरव , शिवाजी शिंदे उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी : राहुल शिंदे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा