डोंबिवली, १९ ऑगस्ट २०२०: कल्याण डोंबिवलीमध्ये लॉाकडाउन असला तरी सुद्धा काही दुकाने ही सम विषम पद्धतीने सूरू होती . मात्र जी दुकाने सुरू आहेत ती दुकाने काही ठराविक काळासाठीच उघडली जाण्यास मुभा होती. त्यामध्ये अत्यावश्यक सेवा आणि इतर अन्य दुकानांचा समावेश आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी व्यायामशाळा मालकांनी व्यायामशाळा उघडण्याची मागणी केली होती, तर, त्यानंतर डोंबिवली मधील ज्वेलर्स असोसिएशनने संपूर्ण दुकाने उघडण्यासाठी आणि रात्री ९ वाजेपर्यंत दुकाने चालू ठेवण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली होती आणि या मागणीला आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने परवानगी दिली आहे.
डोंबिवली मधील ज्वेलर्स असोसिएशन, व्यापारी महासंघ आणि शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी संपूर्ण दुकाने उघडण्यासाठी आणि रात्री ९ वाजेपर्यंत दुकाने चालू ठेवण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली होती . कोरोना हॉटस्पॉट क्षेत्र वगळता इतर ठिकाणी पी१ – पी२ चा नियम रद्द करून सर्व दुकाने दररोज सूरू ठेवण्याची परवानगी मिळाली आहे . आजपासून म्हणजेच १९ ऑगस्ट पासून याची अंमलबजावणी होणार आहे.
जर परवानगी दिली तर आम्ही सोशल डिस्टन्सचे सर्व नियम पाळू. त्यासोबतच दुकानांचे निर्जंतुकीकरण सुद्धा करू असे डोंबिवली व्यापारी महासंघानानी सांगितले होते . त्यांनतर महापालिकेने सर्व अटी आणि शर्तींसह सर्व दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ७ या वेळेत सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे.
मात्र मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, भाजीमार्केट, जिम, स्विमिंग पूल ही ठिकाणे बंदच राहणार आहेत . १० ऑगस्टला कल्याण डोंबिवली मधील ज्वेलर्स असोसिएशन आणि व्यापारी महासंघानी महानगरपालिका आयुक्तांना विनंती केली होती. आज ही मागणी मान्य करण्यात आली आहे त्यामुळे व्यापारी वर्गात समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले आहे .
न्यूज अनकट प्रतिनिधी : राजश्री वाघमारे