कर्जत, १९ ऑगस्ट २०२०: राजमाता अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्रांगणात अहिल्याबाई होळकर यांचा भव्य पुतळा उभा करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते तथा कर्जत – जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेत ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा भव्य पुतळा महाराष्ट्र शासनाच्या वतीने लवकरच उभा करण्याचे जाहिर केले आहे.
राजमाता अहिल्याबाई होळकर विद्यापीठात लोकवर्गणी काढून पुतळा उभा करण्याबाबत कुलगुरू मृणाली फडणीस यांनी समिती स्थापन केली होती. मात्र महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठात महापुरुषांचे पुतळे शासकीय निधीतून झाले आहेत. मग अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा शासकीय निधीतून व्हावा अशी मागणी होत होती. याबाबत आमदार रोहित पवार यांनी शिक्षणमंत्री उदय सामंत यांना भेटून सोलापूर विद्यापीठात अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा शासकीय खर्चाने उभा करावा. अशी मागणी नुकतीच केली होती.
आज उदय सामंत यांनी याबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून विद्यापीठाच्या कुलगुरू मृणाली फडणीस, आमदार रोहित पवार, अहिल्याबाई होळकर यांचे वंशज अक्षय शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख, उपाध्यक्ष सूरज चव्हाण यांची बैठक घेतली. या बैठकीत मंत्री सामंत यांनी,’अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठात महाराष्ट्र शासनाकडून त्यांचा भव्य पुतळा उभा करण्यात येईल. ’असे जाहीर केले.
यावेळी आमदार रोहित पवार यांनी,विद्यापीठात अहिल्याबाई होळकर अध्यासन उभा करावे अशी मागणी केली. अध्यासनाचे काम लवकरच मार्गी लावण्याबाबत सामंत यांनी अभिवचन दिले. याबाबतचे आदेश मंत्रीमहोदयानी दिले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष