मुंबई, २१ ऑगस्ट २०२०: पिकांच्या उत्पादनापासून ते विपणनापर्यंत, शेतकऱ्यांना व्यवहार्य शेती कशा प्रकारे करता येईल यादृष्टीनं नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून काम करावं, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुंबईत वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा आढावा घेताना बोलत होते. कृषिमंत्री दादाजी भुसे, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, यांच्यासह इतर ज्येष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
कृषी विभागातल्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हमी भाव नाही तर हमखास भाव मिळेल, अशा पद्धतीनं पीक उत्पादनाचं नियोजन करावं, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. शेतकरी ते ग्राहक अशी साखळी तयार करता येईल व अशा दृष्टीनं, कृषी संजीवनी प्रकल्प योजनेला बाळासाहेब ठाकरे स्मार्ट ग्राम प्रकल्पाची जोड द्यावी, असं ते म्हणाले.
ज्या पिकांना बाजारपेठ आहे तेच पिकलं पाहिजे, अशा पद्धतीनं नियोजन करुन, बाजारपेठ असलेल्या पिकांचं उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करावं, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: