पिंपरी चिंचवड, २८ ऑगस्ट २०२०: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही आज पिंपरी-चिंचवडमध्ये एका रुग्णालयाच्या उद्घाटनाच्या सोहळ्यादरम्यान एकत्र आले. आज देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन्ही नेते पुन्हा एकदा एकाच मंचावर उपस्थित राहणार यावरून माध्यमांमध्ये व राजकीय वर्तुळात देखील चर्चा सुरू होती. पिंपरी-चिंचवड मध्ये कोविड रुग्णालय बनवण्यात आले आहे. हे रुग्णालय दोनशे ऑक्सीजन युक्त खाटांचे आहे. याच रुग्णालयाचे आज लोकार्पण करण्यात आले.
मात्र चर्चा होती ती दोन्ही नेते एकाच मंचावर उपस्थित राहण्याची. यावेळी माध्यमांसमोर बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले की, “फडणवीस आणि मी दोघे एकत्र येणार म्हटलं, की लगेच ब्रेकिंग न्यूज होते” अशा शब्दात अजितदादांनी टोलेबाजी केली. आठवड्याभरातला अजित पवारांचा हा रुग्णालय लोकार्पण करण्याचा तिसरा कार्यक्रम आहे. याआधी त्यांनी पुण्यात शिवाजीनगर येथे कोविड रूग्णालय लोकार्पण केलं होतं.
आज लोकार्पण केलेल्या रुग्णालया विषयी सांगताना ते म्हणाले की, “गेल्या रविवारपासून हा तिसरा कार्यक्रम आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने स्वतः खर्च करुन हे रुग्णालय उभं केलं आहे, त्यांचं अभिनंदन. नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या उपचारासाठी अडचण नको म्हणून हे रुग्णालय आहे. उद्या कुठल्याही नागरिकाला बेड उपलब्ध नाही, असं होता कामा नये, त्यासाठी हा चांगला प्रयत्न आहे”
न्यूज अनकट प्रतिनिधी