नवी दिल्ली, २८ ऑगस्ट २०२०: कोरोना महामारिमुळे सर्वांचे आर्थिक नुकसान झालेच आहे परंतु बहुतांश विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. तसेच अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबत आज सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी केली आहे. त्यात असे समोर आले आहे की , अंतिम वर्षांच्या परीक्षा झाल्याच पाहिजे, परीक्षा घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून पुढील वर्गात पाठवता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायालयाने असे ही म्हंटले आहे की, विद्यार्थ्यांना जर पुढील वर्षात पाठवायचे असेल तर त्यांच्या परीक्षा घेणे आवश्यकच आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत साथीच्या आजाराच्या दृष्टीने राज्ये परीक्षा पुढे ढकलू शकतात आणि तारखा निश्चित करण्यासाठी यूजीसीशी सल्ला मसलत करू शकतात.
तसेच प्रथम आणि द्वितीय वर्षाचे निकाल हे आधीच्या सत्रांच्या गुणांच्या आधारे मूल्यांकन करून काढण्यात आले परंतु शेवटच्या वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या निकाल हा आधीच्या सत्रांच्या गुणांच्या आधारे मूल्यांकन करून काढणे हे आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कक्षेत बसत नाही ,असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे