दौंड, दि. ३० ऑगस्ट २०२०: पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मळद (ता. दौंड) येथे दोन दुचाकीवरून आलेल्या पाच चोरटयांनी टेंम्पोतील ३० लाख रूपये लुटल्याप्रकरणी पोलिसांना दहा तासात एका आरोपीसह, १० लाख रूपये व एक दुचाकी ताब्यात घेण्यात यश आले.
मळद येथील वृंदावन हाॅटेलजवळ शनिवारी ( ता. २९ ) रात्री आठ वाजता महामार्गावरून सोलापूरकडे जाणाऱ्या टेंम्पोतून दोन काळया रंगाच्या पल्सर दुचाकीवरून आलेल्या पाच चोरटयांनी ३० लाख रूपये पळवले होते. याबाबत दौंड व यवत पोलिसांनी सुरक्षायंत्रणेवर त्वरित माहिती देऊन मदतीचे आवाहन केले. त्यामुळे ग्रामस्थ व ग्रामसुरक्षा दल सतर्क झाले. पाटस येथील ग्रामस्थ राहील तांबोळी यांच्या सांगण्यावरून पाटस – बारामती रस्त्यालगत एक दुचाकी व ८ लाख २० हजार रूपये रोकड सापडली. रविवारी ( ता. ३० ) पहाटे पोलिस हवालदार बाळासाहेब पानसरे व पोलिस मित्र सोनबा देशमुख यांना पाटस टोलनाक्यावरील एका हाॅटेलमध्ये एक संशयित आरोपी प्रकाश पांडुरंग गोरगल (वय ३६, रा. वाखारी, ता. दौंड ) याला व त्याच्याकडील २ लाख १० हजार रूपयांची रोकड ताब्यात घेतली.
पाटस पोलिसांनी दहा तासात एक दुचाकी, दहा लाख ३० हजार रूपये व एका आरोपीला अटक करण्यात यश आले. तर उर्वरित चार आरोपी व पैशाचा तपास चालू आहे. अटक करण्यात आलेला आरोपी व मुद्देमाल दौंड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनील महाडिक करीत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी