मुंबई, १ सप्टेंबर २०२०: राज्य सरकारने काल अनलॉक चार ची नियमावली जाहीर केली. केंद्र सरकारबरोबरच आता राज्य सरकार देखील हळूहळू लॉकडाऊन नियमांमध्ये सूट देत आहे. काल जाहीर करण्यात आलेल्या निर्देशांक मध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता ज्याची नागरिकांकडून अनेक दिवसांपासून मागणी करण्यात येत होती. कालच्या निर्देशांकामध्ये राज्य सरकारने जिल्हा अंतर्गत आवश्यक असणाऱ्या ई पासला रद्द केले आहे. या पाठोपाठ प्रवाशांसाठी आणखीन एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता रेल्वेने देखील राज्य अंतर्गत प्रवासासाठीही परवानगी दिली आहे.
ई-पास सक्ती रद्द करण्यात आल्यानंतर आता मध्य रेल्वेनेही राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरु करण्याला परवानगी दिली आहे. राज्यांतर्गत रेल्वे बुकिंग उद्यापासून (२ सप्टेंबर २०२० पासून) सुरू होत असल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केलं आहे. यासंदर्भातील एक पत्रक मध्य रेल्वेने जारी केलं आहे.
देशामध्ये कोरोनाचे सावट वाढत चालल्यानंतर देशातील रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. त्यात महाराष्ट्रात याचे प्रमाण सर्वात जास्त होते. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने देखील रेल्वे सेवा बंद ठेवल्या होत्या. राज्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्थलांतरित कामगार. जर आंतरराज्य रेल्वे सेवा सुरू करण्यात आले असत्या तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास आणखीन भर पडला असता. त्यामुळे मागच्या काळात रेल्वे सेवा बंद होत्या. पण, आता स्थिती गंभीर असली तरीदेखील काळाची गरज पाहता रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे.
पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टीम म्हणजेच आरक्षण पद्धतीने २ सप्टेंबरपासून राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरु होणार असल्याचे रेल्वेने या पत्रकामध्ये स्पष्ट केलं आहे. सर्व प्रवाशांना राज्यांतर्गत प्रवासासाठी २ सप्टेंबरपासून तिकीट बुकींग करता येणार आहे असंही रेल्वेनं म्हटलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी