नीरेतील ७७ वर्षीय आजोबा उतरणार कोरोना विरुद्धच्या लढाईत

पुरंदर, २ सप्टेंबर २०२०: पुरंदर पंचायत समितीचे माजी उपसभापती असलेल्या नीरा येथील ७७ वर्षीय आजोबांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनावर मात करून घरी आल्यानंतर नीरेत त्यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर या आजोबांनी आता कोरोन्टाईनचा कालावधी संपल्यानंतर म्हणजेच येत्या १५ तारखे पासून नीरा शहरात कोरोनाविरुद्धच्या लढाईत उतरून लोकांमध्ये कोरोनविषयी जनजागृती करण्याचा मानस जाहीर केला आहे.त्यामुळे आता कोरोना विरुद्धच्या लढाईत हे आजोबाही उतरणार असल्याचे निश्चित झाले आहे.

पुरंदर तालुक्यातील नीरा शहर हे अनेक दिवस कोरोना पासून दूर होते. २२ जुलै रोजी नीरा मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. यानंतर आता नीरेतील कोरोना रुग्णांचा आकडा ५० पर्यंत गेला आहे. त्याच बरोबर कोरोनामुळे दोघांचा मृत्यूही झाला आहे. अशातच पुरंदर पंचायत समितीचे माजी उपसभापती लक्ष्मणराव चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे
निदर्शनास आले. सुरवातीच्या काळात चव्हाण यांच्यासह त्यांच्या घरातील लोक व त्यांच्या चाहत्यांमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले होते. खुद्द चव्हाण हे सुध्दा सुरूवातीला घाबरले होते. पुण्यातील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यांचे नीरेत आगमन होताच नागरिकांनी त्यांचे उस्पुर्त स्वागत केले. पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती दत्ताजी चव्हाण नीराचे पोलीस पाटील राजेंद्र भास्कर, व्यापारी धीरेंद्र रावळ, संजय भंडारी, प्रल्हाद भंडारी, विजय पवार, भैय्यासाहेब खाटपे, आल्ताब सय्यद, बंटी पवार, प्रविण भोईटे, राहुल कदम, धर्मेंद्र येवले, कर्नलवाडीचे माजी उपसरपंच भरत निगडे इत्यादींनी चव्हाण याचे स्वागत केले. लोकांच्या या स्वागताने ते भारावून गेले.

यानंतर बोलताना चव्हाण म्हणाले की, “मी स्वत: कोरोनावर मात केली आहे. आता मला कोरोना काय आहे ? याबाबत चांगलीच माहिती झाली आहे. म्हणूनच येत्या १५ तारखे पासून मी सुद्धा कोरोना विरुद्धच्या लढाईत सामील होणार आहे. लोकांना कोरोनाबाबत खूपच कमी माहिती आहे. त्यामुळेच पुढील काळात लोकांना कोरोनाबाबत माहिती देण्याचे काम मी करणार आहे. न घाबरता योग्य उपचार घेतला तर आपण कोरोनावर सहज मात करू शकतो. कोरोनाची लक्षणे दिसल्यास तातडीने निदान होणे गरजेचे आहे. त्यामुळे लोकांनी आजार लपवण्याचे प्रयत्न करू नये. यामुळे तो पसरण्याचा धोका तर असतोच पण पुढे जाऊन संबंधित व्यक्तीसाठीही धोकादायक ठरू शकते.”

न्यूज अनकट प्रतिनिधी : राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा