टेंभुर्णी उपजिल्हा रुग्णालय निर्मितीसाठी उपमुख्यमंत्री सकारात्मक; आ. बबनराव शिंदे यांची माहिती

माढा, दि. ३ सप्टेंबर २०२०: टेंभुर्णी ता. माढा येथे ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय निर्मितीसाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात यावी अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांच्याकडे माढा मतदारसंघाचे आ. बबनराव शिंदे यांनी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की टेंभुर्णी हे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गाव असून सुमारे वीस हजार लोकसंख्या असलेले गाव आहे. तसेच पंढरपूर अहमदनगर शिर्डी येथे जाणाऱ्या येणाऱ्या भाविकांची  मोठया प्रमाणावर संख्या आहे. टेंभुर्णी येथे एमआयडीसी विकसित झालेली असून परिसरात ४० ते ५० गावे आहेत. सध्या या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहे. राष्ट्रीय महामार्गावरील अपघातग्रस्तांना व परिसरातील  रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत म्हणून सदर ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय होण्याची मागणी येथील जि.प. सदस्य प्रतिनिधी शिवाजीराव पाटील, माजी जि.प. सदस्य संजय पाटील भिमानगरकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष रमेश पाटील,  विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक बबनबापू पाटील, पं. स. सदस्य प्रज्ञा कुटे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष रावसाहेब देशमुख, सरपंच प्रमोद कुटे, टेंभुर्णी येथील बशीर जहागीरदार यांच्यासह सर्व स्तरातील नागरिकांकडून होत आहे.

याबाबत आ. बबनराव शिंदे यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. यावेळी प्रस्तावातील त्रुटी पूर्ण करून फेर प्रस्ताव शासनाकडे सादर करावा अशा सूचना त्यावेळी  संबंधित आरोग्य विभागाच्या अधिकऱ्यांना देण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार प्रस्ताव आरोग्य विभागाने शासनास सादर केलेला आहे.

टेंभुर्णी उपजिल्हा रुग्णालयाला प्रशासकीय मान्यता देण्यासाठी माझा शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू असून आरोग्य विभागाकडून सर्व बाबींची पूर्तता करून घेऊन सध्या याबाबतचा प्रस्ताव  वित्त व नियोजन विभागाकडे पाठविण्यात आलेला आहे. मात्र  सध्याची निर्माण झालेली  कोरोनाची परिस्थिती  यामुळे नवीन प्रकल्पासाठी मंजुरी व  निधी देण्याकरिता शासनाने स्तगिती दिलेली आहे. मात्र माढा तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय नाही. टेंभुर्णी गावची लोकसंख्या वीस हजाराच्या वर असून त्याठिकाणी  ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयासाठी मंजुरी देऊन निधी उपलब्ध करुन देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी सकारात्मक चर्चा झालेली असून ते  मंजुरी देण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेतील असे आ. बबनराव शिंदे यांनी यावेळी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी- प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा