मुंबई, ९ सप्टेंबर २०२०: काही वेळापूर्वीच बीएमसीने कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली होती. त्यापाठोपाठ आता याचा मुंबईमधील असलेल्या फ्लॅटवर देखील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुळात हे प्रकरण २०१८ पासूनच प्रलंबित होतं. परंतु कंगनाने मागील काही दिवसांमध्ये मुंबई विषयी केलेल्या वक्तव्यामुळे मुंबई महानगरपालिकेने या प्रकरणात पुन्हा लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे.
हे प्रकरण आहे मुंबईतील खार रोड पश्चिम भागात १६ व्या रोडवर डिब्रीझ (DeBreez) अपार्टमेंटमध्ये सातव्या मजल्यावर असलेल्या कंगनाच्या फ्लॅट विषयी. या फ्लॅटमध्ये एफएसआयचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने २०१८ मध्ये कंगनाला एमआरटीपी नोटीस दिली होती. यानंतर कंगनाने दिंडोशी कोर्टात दाद मागितली होती. यावेळी कोर्टाने मुंबई महानगरपालिकेला आपली बाजू स्पष्टपणे मांडण्यात सांगितलं होतं. तसेच या कारवाईवर स्टे देखील आणला होता. कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर पालिकेने आपलं कोणतेच म्हणणं कोर्टासमोर स्पष्ट केलं नव्हतं.
गेल्या दोन वर्षात पालिकेने काहीच म्हणणे कोर्टात मांडले नव्हते, परंतु आता कंगनाला घेरण्यासाठी दोन दिवसांपूर्वी कोर्टात पालिकेने आपलं म्हणणं मांडलं आहे. तसंच या प्रकरणी दिलेली स्थगिती मागे घेण्याची विनंती कोर्टाला केली आहे. कोर्टानं स्टे उठवल्यास ऑफिस पाठोपाठ कंगनाच्या राहत्या फ्लॅटमध्ये झालेल्या अनधिकृत बांधकामावरही पालिका कारवाई करु शकते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे