मुंबई, ९ सप्टेंबर २०२०: अभिनेत्री कंगना आणि शिवसेना यांच्यातील वाद वाढत चाललेला दिसत आहे. कंगनाने सतत मुंबई विषयी केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेनेकडून तिचा विरोध करण्यात येत आहे. या वादळाच्या पार्श्वभूमीवर आज कंगना मुंबईमध्ये दाखल झाली आहे. यावेळी देखील शिवसेनेकडून विमानतळावर मोठा विरोध करण्यात आला. यादरम्यान सकाळी ११ वाजता बीएमसीने कंगनाच्या कार्यालयावर कारवाई करत बुलडोझर फिरवला होता.
यावर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. बीएमसीने अचानक केलेल्या या कारवाईमुळे लोकांच्या मनात शंका निर्माण होऊ शकते असे मत त्यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, “बेकायदेशीर बांधकाम होतं की नाही हे सर्व माहीत असल्याशिवाय मी यावरती कोणतेही भाष्य करणार नाही. पण दुसरीकडे मुंबईमध्ये अनाधिकृत बांधकाम ही फार दुर्मिळ गोष्ट असंही नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण या सर्वांची पूर्ण माहिती न घेता कारवाई केली तर लोकांच्या मनात नक्कीच शंकेला जागा निर्माण होते.”
असे असतानाच आणखीन एक प्रकरण समोर येत आहे. २०१८ पासून कंगनाच्या फ्लॅट प्रकरणाचा देखील आता बीएमसीने मागोवा घेण्यास सुरुवात केली आहे. एफएसआय बाबत बीएमसीने कंगनाला नोटीस बजावली होती. यासाठी तिनं कोर्टात धाव घेतली होती. याबाबत कोर्टानं बीएमसीला स्पष्टीकरण मागितलं होतं तसेच या कारवाईवर स्थगिती देखील आणली होती. पण आता बीएमसीनं ही स्थगिती हटवण्यासाठी कोर्टाकडे पुन्हा मागणी केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे