मुंबई, १० सप्टेंबर २०२०: काल कंगना मुंबईत दाखल झाल्यानंतर विमानतळावर चांगलाच गदारोळ झाला होता. मुंबई पोलीस तसेच व्हाय लेव्हलची सिक्युरिटी अश्या ताफ्यासह कंगना तिच्या घरी पोहोचली. सुशांत प्रकरणावरून नेपोटिझम विरोधात बोलणारी कंगना राणावत हळूहळू राजकीय वादामध्ये घुसली. सुरूवातीला अनेक जणांनी तिचं समर्थन देखील केलं. मात्र, आता तिच्या बिन अर्थी विधानानंतर तिला समर्थन करणाऱ्यांनी देखील आपले हात मागे घेण्यास सुरुवात केली आहे. कंगना मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर तिनं मुख्यमंत्र्यांवर एक व्हिडिओ जारी केला. त्यात तिनं मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला आहे.
“उद्धव ठाकरे तुला काय वाटतं, तुम्ही फिल्म माफियासोबत माझं घरं तोडून फार मोठा बदला घेतला. आज माझं घरं तोडलं आहे. उद्या तुझा गर्व तुटेल,” अशी टीका तिनं या व्हिडिओच्या माध्यमातून केली. बीएमसीनं काल तिच्या कार्यालयावर बुलडोजर चालवून कारवाई केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून तिनं ही व्हिडिओ बनवला.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर मागच्या गेटने कंगना राहत्या घराकडे रवाना झाली. कडेकोट पोलीस बंदोबस्तात कंगना विमानतळावरुन पाली हिल इथल्या घरात दाखल झाली. घरी दाखल झाल्यानंतर कंगनाने पालिकेने कारवाई केलेल्या ऑफिसचे व्हिडीओ ट्विटवर पोस्ट केले. “हा लोकशाहीचा मृत्यू,” असे कॅप्शन तिने प्रत्येक व्हिडीओला दिले आहे. जवळपास पाच व्हिडीओ तिने ट्वीट केलं आहे.
काय म्हणाली कंगना…
उद्धव ठाकरे तुला काय वाटतं, तुम्ही फिल्म माफियासोबत माझं घरं तोडून फार मोठा बदला घेतला आहे. आज माझं घर तोडलं आहे, उद्या तुझा गर्व तुटेल. ही वेळेची किमया आहे, लक्षात ठेवा… प्रत्येक वेळ सारखीच राहत नाही.”
“आता मला वाटतं की, तुम्ही माझ्यावर फार मोठी मेहरबानी केली आहे. कारण मला माहिती होतं की काश्मिरी पंडितांवर काय बेतलं असेल, आज मी त्याचा अनुभव घेतला आहे.”
“आज मी या देशाला वचन देते, मी फक्त अयोध्येवरचं नव्हे तर काश्मीरवरही एक चित्रपट बनवेन. त्यातून देशावासियांचे प्रबोधन करेन. कारण मला माहिती होतं, की हे होणार आहे. पण हे माझ्यासोबत झालं आहे. याची काही कारणं आहेत. काही पार्श्वभूमी आहे. उद्धव ठाकरे हे क्रौर्य, ही दहशत आहे. चांगलं झालं हे माझ्यासोबत घडले. याच्यामागे काही कारणं आहेत.
जय हिंद जय महाराष्ट्र…………..”असे कंगनाने या व्हिडीओत म्हटलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे