चीनच्या ताब्यात असलेले पाच युवक आज होणार भारताच्या स्वाधीन…

अरुणाचल प्रदेश, १२ सप्टेंबर २०२०: भारत आणि चीन यांच्यातील सीमा विवादा दरम्यान अरुणाचल प्रदेश मध्ये पाच युवक चीनच्या ताब्यात गेले होते. हे पाच युवक सैन्यामध्ये हमाल व गाईडचं काम करत होते. चुकून सीमा ओलांडून हे पाच युवक चीनच्या बाजूला गेले होते आणि त्यामुळंच चीननं त्यांना ताब्यात घेतलं होतं. अरुणाचल प्रदेशच्या एका आमदारानं चिनी सैनिकांच्या कृत्याविषयी आरोप करीत केंद्र सरकारकडं तक्रार केली होती. यानंतर केंद्र सरकारच्या हालचालींना यश आलेलं दिसत आहे.

चिनी सैन्य आज या हरवलेल्या पाच युवकांना भारताच्या स्वाधीन करणार आहे. आज सकाळी ९.३० च्या दरम्यान हे पाच युवक भारतीय सैन्याच्या स्वाधीन करतील अशी माहिती समोर आलीय. चिनी सैनिक या तरुणांना किबिटू सीमेजवळील वाचा भागात आणून भारतीय सैन्यदलाच्या स्वाधीन करतील. केंद्रीय मंत्री आणि अरुणाचल प्रदेशचं प्रतिनिधित्व करणारे किरण रिजिजू यांनी ट्विट करून याची पुष्टी केली आहे.

चुकून ओलांडली होती सीमा

असं मानलं जातं की ४ सप्टेंबर रोजी या तरुणांनी अप्पर सुबानसिरी जिल्ह्यातून चुकून एलएसी ओलांडली होती. तोच सिंगम, प्रसात रिंगलिंग, डोंगटू इबिया, तनु बकर आणि नागू दिरी अशी भरकटलेल्या तरुणांची नावे आहेत. यंदाची ही दुसरी वेळ आहे जेव्हा अरुणाचलच्या तरूणांना चीनच्या ताब्यातून सोडविण्यात मुत्सद्दी प्रयत्नांना यश आलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा