पुरंदर, दि.१६ सप्टेंबर २०२०: पुरंदर मध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे कोरोना रुग्णांच्या वाहतुकीसाठी लागणारी शासकीय रुग्णवाहिका सेवा अपुरी पडत आहे. हीच गोष्ट ध्यानात घेऊन जेजुरी येथील मार्तंड देव संस्थानचे अध्यक्ष संदीप जगताप यांनी जेव्हा जेव्हा प्रशासनाला ॲम्बुलन्सची गरज पडेल तेव्हा तेव्हा मार्तंड देवस्थान मार्फत रुग्णवाहिका मोफत उपलब्ध करून देण्याचं जाहीर केलं आहे.
पुरंदर तालुक्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र या रुग्णांना कोविड केअर सेंटर पर्यंत नेहण्यासाठी सध्या रुग्णवाहिका मिळेनाशी झाली आहे. अनेकांना दहा-बारा तास वाट पाहूनही रुग्णवाहिका मिळत नाहीत. त्यामुळे पुरंदर मध्ये लोकांमधून आता असंतोष वाढू लागला आहे.
कोरोनाचे रुग्ण वाढत असताना प्रशासनाकडून साधी ॲम्बुलन्स वेळेवर मिळत नसल्याने लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबतची बातमी न्युज अनकटने प्रसिद्ध केली होती. यानंतर या बातमीची दखल घेत जेजुरी येथील मार्तंड देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त संदीप जगताप यांनी प्रशासनाला जेव्हा-जेव्हा रुग्णवाहिका लागेल तेव्हा मार्तंड देव संस्थानच्या दोन ॲम्बुलन्स उपलब्ध करून देऊ असे म्हटले आहे.
मार्तंड देवस्थानच्या वतीने आत्तापर्यंत १००० कोरोना रुग्णांची वाहतूक करण्यात आली आहे. यासाठी त्यांनी तालुक्यात एकूण तीन हजार किलोमीटरचा प्रवासही केला आहे.
मार्तंड देवस्थानकडे सध्या दोन रुग्णवाहिका आहेत. यामधील एक रुग्णवाहिका ऑक्सिजनच्या सोईसह आहे. तर दुसरी सर्वसाधारण रुग्णवाहिका आहे. या दोन्ही रुग्णवाहिकेचे चालक प्रतीक भोसले व विलास पवार ही सेवा पुरवण्यासाठी सदैव तत्पर असतात. त्यामुळे या रुग्णवाहिकेचा प्रशासनाला उपयोग होऊ शकतो. आम्ही ही रुग्णवाहिका विनामूल्य उपलब्ध करून देत असल्याचे जगताप यांनी म्हटले आहे.
प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांनी म्हणजेच तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितल्या नंतर आम्ही रुग्णवाहिका उपलब्ध करून देऊ असे त्यांनी म्हटले आहे. आता प्रशासनाने या रुग्णवाहिकेचा योग्य वापर केला तर पुरंदर मधील कोरोना रुग्णांसाठी ते फायदेशीर ठरणार आहे. मात्र प्रशासनाकडून याबाबत योग्य समन्वय व्हायला हवा. तरच त्याचा फायदा पुरंदरच्या जनतेसाठी होऊ शकतो. तर पाहूयात यापुढे पुरंदरचे प्रशासन याबाबत काय पुढाकार घेते आहे?
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे