अवैध वाळु उपशावर कार्यवाही,तीन आरोपींना अटक

माढा, दि. २९ सप्टेंबर २०२०: टेंभुर्णी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिवसाढवळ्या राजरोसपणे सुरु असलेल्या अवैध व्यावसायावर टेंभुर्णी पोलीस अर्थपुर्ण दुर्लक्ष करत असल्याने “टेंभुर्णी परिसरात अवैध व्यावसाय जोमात, पोलीस प्रशासन कोमात” अशी नागरिकांमधून चर्चा सुरू होती. पोलीस अधिक्षक यांनी गांभीर्याने दखल घेत त्यांच्या विशेष पथकाने भिमा नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर धडक कार्यवाही करत तीन आरोपींना अटक करत सुमारे ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. टेंभुर्णी पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे व अर्थपुर्ण हितसंबंधामुळे पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने धडक कार्यवाही केल्यामुळे टेंभुर्णी पोलीसाची पुरती नाचक्की झाली आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, टेंभुर्णी परिसरात खुलेआम सुरु असलेल्या अवैध व्यावसाय सुरू असून  २८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री ११:५५ वाजता पोलीस अधिकक्ष यांच्या विशेष पथकाने टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रांझणी (देवाची) शिवारात भिमा नदी पात्रातील अवैधरीत्या वाळु उपश्यावर अचानक धाड टाकून तीन आरोपीसह एकूण ४४ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

या कार्यवाहीत शुभम लहू आरडे (वय.२१, रा.शहा, ता.इंदापूर,जि.पुणे), ज्योतीराम राजाराम खुळे (वय.२४, रा. खुळे वस्ती, टेंभुर्णी, ता. माढा, जि.सोलापूर) व गोविंद सिद्धेश्वर घुगे (वय.२० रा.लऊळ, ता.माढा) यांच्या विरोधात भदवि कलम ३७९, ३४ व गौण खनिज प्रतिबंधक कायद्यान्वये टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून १८  लाख २४ हजार ५०० रुपये किंमतीचा अवैधरीत्या वाळूने भरलेला टिपर (क्र.एम.एच.४६ एफ.-३३९७), ८ लाख ६७ हजार ५०० रुपये किंमतीचा महिंद्रा अर्जून ६०५ कंपनीचा ट्रॅक्टर सोबत दोन अवैधरित्या २.५ ब्रास वाळूने भरलेल्या ट्रॉली (क्र.एम.एच.४२ पी ५७५०)  १८ लाख रुपये किंमतीचा एक टिपर (क्र.एम.एच.४५.डी.१३९२) असा एकूण ४४ लाख ९२ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कार्यवाही पोलीस अधिक्षक यांच्या पथकाने पोलीस निरीक्षक विनय बहारे, पोलीस कॉन्स्टेबल राठोड, घुले, जाधव, यांनी ही कारवाई केली असून याबाबत पोलीस हवलदार दत्तात्रय राजेंद्र झिरपे यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दिनांक २८/०९/२०२० रोजी पहाटे १:५६ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास टेंभुर्णीचे कर्तव्यदक्ष पोलीस निरिक्षक राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. स्वामीनाथ लोंढे हे करत आहेत.

मटका, गुटखा, जुगारीवर कधी कार्यवाही होणार.?

टेंभुर्णी पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक पोलिसांच्या अर्थपुर्ण संबंधामुळे राजरोसपणे अवैध व्यवसाय सुरू असल्याने त्यांच्यावर कसलीही कायदेशीर कार्यवाही केली जात नाही. याउलट अवैध व्यावसायाला संरक्षण व अवैध व्यावसायिकांना पोलीस ठाण्यात बोलवून सन्मानाची वागणूक दिली जाते. सर्वसामान्य नागरिकांना मात्र गुन्हेगाराची वागणूक दिली जाते. गोरगरीबांवर अन्याय झाल्यावर त्यांची तक्रार नोंदवली जात नाही. तक्रारीसाठी सुद्धा ठाणेदाराकडून चिरी-मिरीची मागणी केली जाते. टेंभुर्णी परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. मटका, गुटखा, जुगार, दारु, गांजा विक्री खुलेपणाने सुरू आहे. वादग्रस्त जमीनीत गावगुंडांमार्फत हस्तक्षेप केला जात आहे.

बंद असलेले अवैध धंदे मंथलीसाठी जबरदस्तीने चालु करणे व  कोणताही मध्यस्थ न ठेवता अवैध व्यावसायिकांना डायरेक्ट फोनवर मंथली मागितली जात असल्याची चर्चा नागरिकांतून होतआहे. तसेच त्यांना अधिकारी केबीनमध्ये बोलवून सीसीटीव्ही बंद करून तोडपाणी केले जात असल्याची चर्चा संपुर्ण टेंभुर्णी परिसरात होत आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी, पोलीस व अवैध व्यावसायिक तसेच सराईत गुन्हेगार यांचे फोन रेकाॅर्ड सायबर सेलमार्फत तपासावेत तसेच पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासावे अशी मागणी टेंभुर्णीकरांमधून जोर धरत आहे.

टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसायाची सर्वात जास्त “केंद्रे” असून “राजकुमार” मात्र वसुलीत मग्न आहेत. हत्या, आत्महत्येचा तपासणी लागत नाही. चक्क पोलीस ठाण्यातून वाहनांचे स्पेअर पार्ट चोरीला जातात ही अत्यंत गंभीर स्वरूपाची बाब आहे. दैनिक एकमतच्या दनक्याने अवैध वाळू व्यवसायावर पोलीस अधीक्षक यांनी धडक कार्यवाही केली परंतु अर्थपुर्ण संबंधामुळे तसेच वसुली व मंथलीसाठी व्यस्त असलेले टेंभुर्णी पोलीस मात्र अवैध व्यवसायावर कार्यवाही करण्याचे धाडस करणार का ? की त्यांना संरक्षण देत मिठाला जागणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी-प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा