माळेगावात मेडिकल दुकानदाराला मारहाण; दोघांविरोधात गुन्हा दाखल

माळेगाव, २ ऑक्टोबर २०२०: दुकानासमोरील अतिक्रमणाच्या कारणावरून मेडिकल दुकानदाराच्या दुकानात घुसून त्याच्या दुकानातील साहित्याची नासधूस करत त्याच्या गळ्यातील साडे तीन तोळे वजनाची सोन्याची साखळी काढून घेण्यात आली. याशिवाय दुकानाच्या ड्राॅव्हरमधील सुमारे २४ हजार रुपयांची रक्कम काढून घेण्यात आली. माळेगाव बुद्रूक येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी दोघाजणांविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्तात्रय मारूती झगडे (रा. माळेगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली. संदीप बापू आढाव व प्रशांत मोरे या दोघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी (दि. १) रोजी ही सकाळी साडे नऊ वाजता झगडे यांच्या श्री. दत्त मेडिकल दुकानात ही घटना घडली. आढाव व मोरे हे फिर्यादीच्या दुकानात आले. त्यावेळी दुकानासमोर पांढऱ्या रंगाची मोटार उभी होती. त्यात दोघे बसलेले होते. 

आढाव यांनी माझ्या वडीलांच्या दुकानाचे सामान रस्त्यावर का टाकून दिले अशी विचारणा करत दुकानात शिरुन फिर्य़ादीच्या कानाखाली मारुन काॅलर पकडली. दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त टाकून फेकून देत फिर्यादीच्या गळ्यातील साडे तीन तोळे वजनाची १ लाख ४० हजार रुपये किंमतीची सोन्याची साखळी बळजबरीने काढून घेण्यात आली. मोरे हे फिर्यादीला म्हणाले की, हा माझा माणूस आहे. याला काही त्रास झाल्यास मी तुमचे दुकान फोडून टाकून तुम्हाला सोडणार नाही. या झटापटीत दोघांपैकी एकाने दुकानाच्या गल्ल्यातील २३ हजार ४८० रुपये काढून घेतल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. 

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा