मुंबई, ४ ऑक्टोंबर २०२०: शिवसेना खासदार व शिवसेनेचे मुखपत्र सामना’चे संपादक संजय राऊत यांनी आजच्या सामनातील रोखठोक सदरात उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणावरुन योगी सरकार, मोदी सरकार आणि भाजपावर टीकेची झोड उठवली आहे. एका नटीची भिंत पाडली म्हणून किंचाळणारा समाज एका बेटीवर बलात्कार, हत्या होऊनही शांत आहे. भावनेचा कडेलोट आणि कायद्याचं वस्त्रहरण झालं आहे. असं त्यांनी आपल्या लेखात म्हटले आहे.
उत्तर प्रदेशातील हाथरस या ठिकाणी १९ वर्षांच्या तरुणीवर बलात्कार झाला. नंतर तिच्यावर हल्ला करण्यात आला. उपचार घेत असताना तिचा मृत्यू झाला. एवढं सगळं होऊन देखील कुटुंबीयांच्या भावनांचा अनादर करत उत्तर प्रदेश पोलिसांनी परस्पर तिचा अंत्यसंस्कार देखील करून टाकला. ‘बेटी बचाव’वाल्यांच्या ढोंगी रामराज्यात एक बेटी बचाव बचाव असा आक्रोश करत तडफडून मेली. यावेळी तिला न्याय मिळाला पाहिजे म्हणून सुशांतप्रमाणं कोणी प्रखर आंदोलन चालवलं नाही. नटी कंगनाच्या घरावर हातोडा पडताच काय हा अन्याय? असं बोंबलणारा मीडियादेखील कंठशोष करताना दिसला नाही.. का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय.
काँग्रेस नेते राहुल आणि प्रियंका गांधी या पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेले तेव्हा पोलिसांनी त्यांना फक्त अडवले नाही, तर त्यांची कॉलर पकडून खाली पाडले. महिनाभरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत आले होते. त्यांनी रामजन्मभूमीची पूजा केली. त्यावेळी श्रीरामासोबत सीतामाईचा वावर तिथे होता. त्याच भूमीवर एक नवी निर्भया स्वतःच्या शरीराची लक्तरे उघड्यावर टाकून तडफडून मेली. हे सगळं त्याच उत्तर प्रदेशात घडलं जिथं भाजपाचं सरकार आहे. अशा प्रकारची घटना महाराष्ट्रात घडली असती तर सरकार बरखास्तीची, राष्ट्रपती राजवटीची मागणी झाली असती. उत्तरप्रदेशबाबत अशी मागणी होताना दिसत नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे