मुंबई, ७ ऑक्टोंबर २०२०: मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. त्यानंतर मराठा आंदोलन पुन्हा सक्रिय झालं आहे. मराठा आरक्षणावर पुन्हा एकदा टांगती तलवार आल्यामुळं मराठा समाजातील विद्यार्थी व तरुणांसमोर मोठा प्रश्न उभा राहिलाय. येत्या काळात राज्यात एमपीएससीच्या परीक्षा घेतल्या जाणार होत्या. मात्र, या दरम्यान मराठा समाजातील तरुणांना कोणत्या प्रवर्गात ठेवलं जाणार याबाबत कोणतीही निश्चितता नव्हती त्यामुळं या परीक्षा पुढं ढकलण्याची मागणी करण्यात येत आहे.
या मागण्यांसाठी राज्यभरात मराठा समाजाच्या बैठका होत आहेत. बुधवारी नवी मुंबईत माथाडी समाजाची बैठक होणार आहे. या बेठकीला छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे उपस्थित राहणार होते. मात्र, आता या महत्त्वाच्या बैठकीला खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे येणार नसल्याची माहिती समोर येत आहे.
माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी आज मुंबई इथं मराठा क्रांती मोर्चाची बैठक बोलावली होती. बेठकीला छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे उपस्थित राहणार होते. त्यामुळं सगळ्यांचं लक्ष या बैठकीकडं होतं. पण, आता उदयनराजे यांनी बैठकीकडं पाठ फिरवल्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान या बैठकी वरून सुरू असलेली ही चर्चा नाकारत नरेंद्र पाटील म्हणाले की, उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे हे दोघेही बैठकीसाठी उपस्थित राहणार. उदयनराजे भोसले सध्या पुण्यामध्ये आहेत. नवी मुंबईला पोहोचायला दीड तास लागतो. दोन्ही राजे उपस्थित असल्यावर बैठक सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे