संस्थापकानेच लुटली पतसंस्था, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

11

लोणी काळभोर, ८ ऑक्टोंबर २०२०: लोणी काळभोर येथील पतसंस्थेच्या संस्थापकानं संचालक मंडळाचा कसलाही ठराव न घेता व त्यांना विश्वासात न घेता संस्थेचे चेअरमन व सेक्रेटरी यांची बेकायदेशीर निवड केली. या तिघांनी संगनमत करून संस्थेच्या सभासदांनी कर्जासाठी अर्ज केलेला नसतानाही त्यांनी कर्ज उचलल्याचं दाखवून व स्वतः कुठलंही तारण न ठेवता एकूण ६७ लाख ७९ हजार ४१ रुपयांचा गैरव्यवहार केला आहे.

अनियमितता करूनही ठेवीदारांच्या खोट्या सह्या करून परस्पर कर्ज उचलून स्वतःच्या फायद्यासाठी वापरलं व सभासदांची व ठेवीदारांची फसवणूक केल्याचं उघडकीस आलं आहे.

या प्रकरणी सहकारी संस्था मर्यादित पुण्याचे शासकीय प्रमाणित लेखापरीक्षक यशवंत भागुजी पदुकले वय ६८ यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. त्यांच्या तक्रारीनुसार लोणी काळभोर येथील ‘लक्ष्मी महिला बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित’ या संस्थेचे संस्थापक संजय दिगंबर कांचन, अध्यक्ष वैशाली संजय कांचन, रा. दोघे उरुळी कांचन व सचिव लता नामदेव कुंजीर, रा. हडपसर या तिघा विरोधात लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार या पतसंस्थेचे ४३२ सभासद आहेत. यशवंत पदुकले यांनी ऑगस्ट २०१८ पासून संस्थेचं लेखी परीक्षण केलं व सदर संस्थेचं लेखापरीक्षण करीत असताना त्यांना संस्थेच्या काही सभासदांना संस्थेनं कर्ज दिल्याबाबत कर्ज खतावणी रजिस्टर व खाते बुक तपासलं असता बोगस कर्जदार दाखवून पैशाचा गैरकारभार केल्याचं निदर्शनास आलं आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलिस स्टेशन करत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे