मुंबई, ८ ऑक्टोंबर २०२०: कोरोना काळात राज्य शासनाच्या वतीनं सामान्य नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मास्क वापरणं आणि सॅनिटायझरनं हात धुवावेत, असं वारंवार आवाहन केलं जात आहे. सुरुवातीच्या काळात अचानक या गोष्टींची मागणी वाढल्यामुळं दोन्हींच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झालेली दिसली. परिणामी सॅनिटायझर आणि मास्क बनावट प्रतीचं देखील बाजारात यायला लागलं. एन ९५ ची किंमत ४० रुपये होती. कोरोना काळात त्याची किंमत वाढवून १७५ ते २५० रुपयापर्यंत गेली होती. म्हणजेच ४० रुपये किंमतीचे मास्क विक्रते ४०० ते ५०० टक्के वाढीव दरानं विकत होते.
त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमतीवर नियंत्रण आणण्यासाठी समिती नेमली होती. या समितीनं नुकताच राज्य सरकारला याबाबतचा अहवाल सादर केलाय. एन ९५ मास्क मध्ये विभिन्न प्रकार आहेत. या प्रकारानुसार एन ९५ च्या किमती १९ रुपयापासून ते ५० रुपयांपर्यंत निश्चित करण्यात येणार आहेत. यासह जे साधारण मास्क आहेत जे दोन किंवा तीन पट्ट्या वापरून बनवलेले असतात त्यांची किंमत केवळ २ ते ४ रुपये असणार आहे. या साध्या मास्क मध्ये देखील सुरुवातीच्या काळात किमतीत वाढ दिसून आली होती. ८ ते १० रुपयांना मिळणारे हे मास्क सुरुवातीच्या काळात १५ ते २० रुपयांना विकले गेले होते.
राजेश टोपे यांनी सांगितलं की, “या समितीनं निर्धारित केलेल्या किंमतीवर निर्णय घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या किंमतींना शासन मान्यता मिळाल्यानंतर सुधारीत दरानुसार मास्क विक्री करणं बंधनकारक असणार आहे. तसंच सर्वसामान्यांना परवडणाऱ्या अशा किफायतशीर किमतीत मास्क उपलब्ध होणार असल्यानं असा निर्णय घेणारे महाराष्ट्र पहिलं राज्य ठरलं आहे.”
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे