दुबई, ८ ऑक्टोबर २०२०: आयपीएल २०२० मध्ये झालेल्या २१ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने चेन्नई सुपर किंग्स संघाला १० धावांनी पराभूत केले आहे. मागच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने एकहाती विजय मिळवल्यानंतर त्यांच्या चाहत्यांकडून अपेक्षा वाढल्या होत्या. सर्वांना वाटू लागले होते की चेन्नई संघ आपल्या जुन्या फॉर्म मध्ये आला आहे. परंतु असे काहीच झाले नाही.
सामन्यात, कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाता संघाने २० षटक अखेर १० बाद १६७ धावा केल्या. यात कोलकाता संघाचा सलामीचा फलंदाज राहुल त्रिपाठी याने ५१ चेंडूत ८१ धावांची खेळी केली. यात ३ षटकार आणि ८ चौकारांचा समावेश होता. त्रिपाठीला इतर कोणत्याही फलंदाजाकडून हवी तशी साथ मिळाली नाही. शुबमन गील याने ११, नवनीत राणा याने ९, सुनील नरेनने ९ चेंडूत १७ आणि मॉर्गन याने १० चेंडूत फक्त ७ धावा केल्या. तसेच कोलकाता संघाचा बिग हिटर म्हणून ओळखला जाणारा फलंदाज रसल याने फक्त २ धावा केल्या. चेन्नई संघाकडून गोलंदाजी करतांना ब्रावोला ४ षटकात ३७ धावा देत ३ विकेट्स मिळाल्या, तसेच कर्रण, शार्दुल ठाकूर आणि कर्ण शर्मा यांना प्रत्येकी २, २ विकेट्स मिळाल्या.
१६८ धावांचा पाठलाग करत असताना सुरुवातील चेन्नई सुपर किंग्स संघाने जोरदार सुरुवात केली. शेन वॉटसन याने ४० चेंडूत अर्धशतक झळकावत ५० धावा केल्या. यात ६ चौकार आणि एक षटकाराचा समावेश होता. तसेच डू प्ले सी याने १७ तर अंबती रायुडू याने २७ चेंडूत ३० धावांची खेळी केली. शेवटच्या षटकांमध्ये सामना कोणत्याही बाजूला जाण्याची चिन्ह दिसत होती. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्स संघाने विकेट्स गमवायला सुरुवात केली आणि सामनाही हातातून निसटून गेला. कोलकाता संघाकडून शिवम मावी, चक्रवर्ती, नगरकोटी, सुनील नरेन आणि आंद्रे रसल यांना प्रत्येकी एक एक विकेट्स मिळाल्या. अंतिम षटकात २६ धावांची गरज असताना चेन्नई सुपर किंग्सचे फलंदाज धावांचा पाठलाग करण्यात अपयशी ठरले आणि कोलकाता संघाने सामना १० धावांनी आपल्या नावावर केला.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे